Ram Navami 2024: अयोध्येमधील श्रीराम मंदिरामध्ये रामलला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर पहिल्यांदाच या नगरीमध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रामनवमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देखील सोशल मीडियावर खास पोस्ट करत देशवासीयांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. PM मोदी यांनी 'X' वर पोस्ट करत म्हटले आहे की, "ही पहिली रामनवमी आहे, आमचे रामलला अयोध्येच्या भव्यदिव्य राम मंदिरामध्ये विराजमान झाले आहेत. आज रामनवमीच्या या उत्सवामुळे अयोध्यत आनंदाचे वातावरण आहे. पाच शतकांच्या प्रतीक्षेनंतर आज अयोध्येमध्ये रामनवमी साजरी करण्याचे भाग्य लाभले आहे. देशवासीयांच्या इतक्या वर्षांच्या कठोर तपश्चर्येचे आणि त्यागाचे हे फळ आहे".
अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. यानंतर येथे रामनवमीचा उत्सव पहिल्यांदाच साजरा केला जात आहे.
(प्रभू श्रीरामाच्या नावावरून तुमच्या मुलाचे ठेवा सुंदर आणि अर्थपूर्ण नाव)
आणखी एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, भगवान श्रीराम भारतीयांच्या मनामनात-अंत:करणामध्ये विराजमान आहेत. भव्य राम मंदिरातील हा पहिला रामनवमी सोहळा म्हणजे राम मंदिर उभारणीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या असंख्य रामभक्तांचे, संत-महात्मांचे स्मरण करून आदरांजली अर्पण करण्याची संधी आहे.
(नागपूरची चितार ओळी अन् विविध छटांनी साकारलेलं रामाचं ते प्रसन्न करणारं रूप)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे असेही म्हटले आहे की, "मला पूर्ण विश्वास आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचे जीवन आणि त्यांचे आदर्श विकसित भारताच्या उभारणीसाठी सशक्त आधारस्तंभ ठरतील. त्यांच्या आशीर्वादाने आत्मनिर्भर भारताच्या संकल्पास नवी ऊर्जा मिळेल. प्रभू श्रीराम यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!"
लाखो भाविक येण्याची अपेक्षा
रामनवमीनिमित्ताने अयोध्या धाममध्ये 9 एप्रिलपासून रामनवमी जत्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे रामनवमीनिमित्त अयोध्येत 25 लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कडेकोट सुरक्षाव्यवस्था
रामनवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जत्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी 11 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 26 पोलीस उपअधीक्षक, 150 निरीक्षक, 400 उपनिरीक्षक, 25 महिला उपनिरीक्षक, 1 हजार 305 मुख्य कॉन्स्टेबल, 270 महिला मुख्य कॉन्स्टेबल यासह अन्य सुरक्षादलातील कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तामध्ये समावेश आहे. याशिवाय मंदिर परिसर आणि जत्रेच्या आसपासच्या परिसरामध्ये 24 तास कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
(श्रीरामापासून प्रत्येकानंच शिकल्या पाहिजेत 'या' 5 गोष्टी)
'सूर्य तिलक'ची तयार पूर्ण
अयोध्येमध्ये प्रभू श्री रामलला यांच्या 'सूर्य तिलक'ची देखील तयारी पूर्ण झाली आहे. रामनवमीनिमित्त दुपारच्या वेळेस सूर्याची किरणे रामलला यांच्या कपाळास स्पर्श करतील. मंदिरामध्ये बसवण्यात आलेल्या एका विशिष्ट यंत्रणेच्या माध्यमातून 'सूर्य तिलक' केला जाणार आहे. दरम्यान मंगळवारी (16 एप्रिल) 'सूर्य तिलक'ची चाचणी देखील यशस्वीरित्या पार पडली.