PM Modi Speech : पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' करावाईवर लोकसभेत दोन दिवस चर्चा झाली. या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की, या सत्राच्या सुरुवातीला जेव्हा मी माध्यमांशी बोलत होतो, तेव्हा मी उल्लेख केला होता की हे सत्र भारताच्या विजयोत्सवाचे सत्र आहे. हे भारताच्या गौरवगानाचे सत्र आहे. मी हे सांगू इच्छितो की हा विजयोत्सव शत्रूला मातीत गाडण्याचा आहे. हा विजयोत्सव सिंदुराची शपथ पूर्ण करण्याचा आहे. हा विजयोत्सव लष्कराच्या शौर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. तसेच 140 कोटी भारतीयांच्या इच्छाशक्तीचे प्रतीक आहे.
'मी आरसा दाखवण्यासाठी उभा'
पंतप्रधान मोदी म्हणाले, ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यांना आरसा दाखवण्यासाठी मी उभा आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये ज्या प्रकारे क्रूर घटना घडली, ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी निरपराध लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या, ही क्रूरतेची हद्द होती. भारताला हिंसेच्या आगीत ढकलण्याचा हा पूर्वनियोजित प्रयत्न होता. भारतात दंगली घडवण्याचे हे षडयंत्र होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, मी सांगितले होते की असा हल्ला करणाऱ्यांना मातीत गाडले जाईल. त्यांना कल्पनेपलीकडची शिक्षा मिळेल. आम्हाला आमच्या सैन्य दलांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. लष्कराला कारवाईची पूर्ण सूट देण्यात आली. बैठकीत हे ठरले की कधी, कुठे, कसे आणि कोणत्या प्रकारे कारवाई करायची, हे सैन्यच ठरवेल.
( नक्की वाचा : Rahul Gandhi: 'ट्रम्प खोटं बोलत असतील तर संसदेत सांगा', राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेंज )
10 वर्षांपासून तयारी
आम्ही 10 वर्षांपासून तयारी केली नसती, तर आपले किती मोठे नुकसान झाले असते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. युद्धादरम्यान आपल्या तिन्ही सेनांमध्ये अद्भुत समन्वय होता. आज दहशतवादी म्होरक्यांना झोप येत नाही, त्यांना माहीत आहे की हल्ला केला तर भारत येईल आणि मारून जाईल. आपल्या कारवाईची व्याप्ती किती मोठी आहे, हे जगाने पाहिले आहे. सिंदूरपासून सिंधूपर्यंत पाकिस्तानवर कारवाई केली आहे. ऑपरेशन सिंदूरने हे निश्चित केले आहे की भारतातील दहशतवादी हल्ल्याच्या म्होरक्यांना आणि पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल.
जगभरातून भारताला पाठिंबा
जगातील कोणत्याही देशाने भारताला आत्मसंरक्षणासाठी कारवाई करण्यापासून रोखले नाही. ऑपरेशन सिंदूरदरम्यान केवळ तीन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. फ्रान्स-जर्मनी किंवा इतर कोणत्याही देशाचे नाव घ्या, जगभरातून भारताला पाठिंबा मिळाला. जगातील देशांकडून पाठिंबा मिळाला, पण हे दुर्दैव आहे की माझ्या देशाच्या पराक्रमाला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही. 22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यानंतर 3-4 दिवसांतच ते उड्या मारत होते. '56 इंचाची छाती कुठे गेली?', 'मोदी कुठे हरवले?', 'मोदी तर फेल झाले,' असे म्हणायला त्यांनी सुरुवात केली होती.