पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित केलं. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी स्वातंत्र्यदिन हा 140 कोटी देशवासियांसाठी 'संकल्पांचा, सामूहिक सिद्धींचा आणि गौरवाचा' दिवस असल्याचे सांगून केली. यावेळी त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' या लष्करी कारवाईचा उल्लेख करत पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून कठोर संदेश दिला.
देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी पहलगाम दहशदवादी हल्ल्यानंतर'ऑपरेशन सिंदूर' या लष्करी कारवाईतील शूरवीरांना सलाम केला आणि पाकिस्तानला दहशतवादावर कठोर संदेश दिला.
‘ऑपरेशन सिंदूर' म्हणजे आक्रोशाची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदी यांनी 'ऑपरेशन सिंदूर'चा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे निरपराध लोकांचे कत्लेआम केले, धर्म विचारून लोकांना मारले, पत्नीसमोर पतीला आणि मुलांसमोर वडिलांना ठार मारले, त्यामुळे संपूर्ण देशात आक्रोश होता. 'ऑपरेशन सिंदूर' ही त्याच आक्रोशाची प्रतिक्रिया आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेला खुली सूट देण्यात आली होती. लक्ष्य तुम्ही निवडा आणि वेळही तुम्ही निवडा, असे त्यांना सांगितले होते. आपल्या सैनिकांनी अनेक दशकात झाले नव्हते, असे काम करून दाखवले. शेकडो किलोमीटर शत्रू देशात घुसून दहशतवाद्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानची झोप अजूनही उडालेली आहे. आपल्या सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेबाहेरील शिक्षा दिली आहे. पाकिस्तानमध्ये झालेला विध्वंस इतका मोठा आहे की, आजही त्याबद्दल नवीन माहिती समोर येत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
'न्यूक्लियर ब्लॅकमेल' सहन करणार नाही
दहशतवादावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आपला देश अनेक दशकांपासून दहशतवाद सहन करत आला आहे. आता दहशतवाद आणि त्यांना पोसणाऱ्यांना भारत वेगळे मानणार नाही. ते दोघेही मानवतेचे समान शत्रू आहेत. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानच्या 'न्यूक्लियर ब्लॅकमेल'च्या धमक्यांनाही सडेतोड उत्तर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, "भारत आता 'न्यूक्लियर'च्या धमक्यांना सहन करणार नाही. हे ब्लॅकमेल खूप दिवसांपासून सुरू आहे. पण, आता ते सहन केले जाणार नाही. पुढेही शत्रूंनी कुरापती सुरू ठेवल्या तर भारतीय सेना ठरवेल तसेच होईल आणि आम्ही चोख उत्तर देऊ.