PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर' वरील चर्चेला उत्तर दिलं. त्यांनी यावेळी कोणत्याही जागतिक नेत्याने भारताला आपली कारवाई थांबवण्यास सांगितले नाही, असे स्पष्ट केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे युद्धविराम झाल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला होता. त्याला मोदींनी जोरदार उत्तर दिलं. 'आपल्याला परदेशातून पाठिंबा मिळाला. पण, दुर्दैवाने अजूनही आपल्याला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही,' असं पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले, "10 मे रोजी, आम्ही 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गतची कारवाई थांबवली. याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. काही लोकं सैन्य जे सांगते त्यावर विश्वास ठेवत नाहीत, पण पाकिस्तान काय म्हणतो यावर ते विश्वास ठेवतात. जेव्हा पाकिस्तानने दहशतवाद्यांसोबत उभे राहण्याचा निर्णय घेतला, तेव्हा भारतीय सैन्याने अशी कारवाई केली जी पाकिस्तान अनेक वर्षे लक्षात ठेवेल. 9 मे रोजी, आमची क्षेपणास्त्रे डागण्यात आली, ज्यामुळे पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. ''
'' पाकिस्तानी सैन्याने युद्धबंदीसाठी विनंती केली. कोणत्याही जागतिक नेत्याने भारताला आपली कारवाई थांबवण्यास सांगितले नाही," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
( नक्की वाचा : PM Modi Speech : 'देशात दंगली घडवण्याचे षडयंत्र होते' पंतप्रधान मोदींचा मोठा गौप्यस्फोट )
गोळीला उत्तर गोळ्याने...
पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले की, "9 मे रोजी, जे.डी. व्हान्स यांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मी त्यांचे कॉल घेऊ शकलो नाही कारण मी एका बैठकीत व्यस्त होतो. त्यानंतर, मी त्यांना परत फोन केला आणि त्यांनी मला सांगितले की पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करणार आहे. मी त्यांना सांगितले की जर पाकिस्तानने असे करण्याचा विचार केला, तर त्याचा परिणाम त्यांच्यावरच उलटेल. त्यांनी हल्ला केला, तर आम्ही त्याहून मोठा हल्ला करू. मी म्हणालो की त्यांच्या 'गोळी'ला आमच्या 'गोळ्या'ने उत्तर दिले जाईल.''
( नक्की वाचा : Rahul Gandhi: 'ट्रम्प खोटं बोलत असतील तर संसदेत सांगा', राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेंज )
"देश पाहत आहे की भारत आत्मनिर्भर होत आहे, पण हे देखील पाहत आहे की भारत प्रगती करत असताना, काँग्रेस मुद्द्यांसाठी पाकिस्तानवर अवलंबून आहे. काँग्रेस पाकिस्तानमधून मुद्दे आयात करत आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.