नवी दिल्लीत सुरु झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते झालं. साहित्य संमेलनाचं हे 98 वं वर्ष आहे. ज्येष्ठ साहित्यिक तारा भावळकर या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. तर शरद पवार स्वागताध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलेल्या भाषणात मराठी साहित्य आणि महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा आढावा घेत, वैभवशाली इतिहासाचा गौरवानं उल्लेख केला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एक भाषा किंवा राज्यापुरते मर्यादीत नाही. मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यलढ्याचा सुंगध आहे. यामध्ये महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. ग्यानबा-तुकारामांच्या मराठीला राजधानी दिली अतिशय मनापासून अभिवादन करत आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
मराठी प्रेम आणि RSS
मराठीबद्दलच्या माझ्या प्रेमाची तुम्हाला माहिती आहे. मराठीचे नवे शब्द शिकण्याचा प्रयत्न मी नेहमी केला आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी यावेळी त्यांच्या मराठी प्रेमाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या कनेक्शनचाही उल्लेख केला.
( नक्की वाचा : राजकारण्यांचा साहित्य संमेलनाशी संबंध काय? शरद पवारांनी थेट सांगितलं )
पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, 'आज आपल्याला गोष्टीचाही अभिमान हवा की, महाराष्ट्राच्या जमिनीवर एका मराठी भाषिक महापुरुषाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बीज रोवलं. आज ते एका वटवृक्षाच्या रुपानं शताब्दी वर्ष साजरं करत आहे. वेदापासून विवेकानंदापर्यंत भारताची महान परंपरा आणि संस्कृतीला नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा संस्कार यज्ञ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या 100 वर्षांपासून करत आहे.
माझ्यासारख्या लाखो जणांना RSS नं देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली, हे माझे सौभाग्य आहे. संघामुळेच मला मराठी भाषा आणि परंपरेशी जोडण्याचं भाग्य लाभलं.'
( नक्की वाचा : '1999 साली वाजपेयी सरकार मीच पाडलं', शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट )
भाषा आईसारखी असते - PM मोदी
महाराष्ट्र आणि मुंबईनं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला नव्या उंचीवर नेलं. आज भारत जगातील सर्वात प्राचीन जीवंत संस्कृतीपैकी एक आहे. कारण आपण सतत नव्या विचारांचे स्वागत केले. भारतामध्ये जगातील सर्वात मोठे भाषेचं वैविध्य आहे. हेच वैविध्य आपल्या एकतेचा सर्वात मोठं उदाहरण आहे. मराठी याचे सर्वात मोठं उदाहरण आहे. भाषा ही आपल्या आईसारखी असते. ते मुलांना नवे ज्ञान देते. आईसारखीच भाषाही कुणामध्ये भेद करत नाही, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
भारतीय भाषेत कधीही परस्पर वैर नव्हते. भाषांनी एकमेकांचा स्वीकार केला आहे. अनेकदा भाषेच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो. त्य़ावेळी भाषेचा वारसाच त्याला उत्तर देते, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं हे 98 वं वर्ष आहे. दोन वर्षांनी होणाऱ्या शताब्दी वर्षाची तयारी आत्तापासूनच करा. जास्तीत जास्त जणांना मराठीशी जोडण्याचा प्रयत्न करा. अनेकजण ऑलनाईन माध्यमातूनही मराठीची सेवा करत आहेत, त्यांचीही दखल घ्या, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिला.