
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. 1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकार संसदेतील विश्वासदर्शक ठरावात पराभूत झाले होते. अवघ्या एका मतानं वाजपेयी सरकारला राजीनामा द्यावा लागला होता. ते सरकार मी पाडल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी केला आहे. दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी 26 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा गौप्यस्फोट केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला निलेशकुमार कुलकर्णी यांच्या 'संसद भवन ते सेंट्रल विस्टा' या मराठी पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये झाले. शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
शरद पवारांनी जुन्या संसद भवनाच्या आठवणी सांगताना 1999 साली घडलेल्या घटनेचा गौप्यस्फोट केला. त्यावेळी तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारवर लोकसभेत अविश्वासदर्शक ठाराव दाखल करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार हे काँग्रेसमध्ये होते. त्याचबरोबर लोकसभेत विरोधी पक्षनेते होते.
( नक्की वाचा : 'शरद पवारांनी मला कधी गुगली टाकला नाही', दिल्लीतील कार्यक्रमात शिंदेंचा सिक्सर )
शरद पवार यावेळी म्हणाले की, 'मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो, हे अनेकांना आठवणार नाही. आम्ही वाजपेयी सरकाच्या विरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावावर मोठी चर्चा झाली. अविश्वासदर्शक ठरावच्या मतदानापूर्वी आठ ते दहा मिनिटं ब्रेक होता. मी त्यावेळी संसदेच्या बाहेर 'चर्चेसाठी' गेलो.
आम्ही परत आल्यानंतर मतदान झाले. त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या एका खासदारानं विरोधकांच्या बाजूनं मतदानं केलं. वाजपेयी सरकार फक्त एका मतानं पडले. आम्ही हे कसं केलं हे सांगणार नाही, असं पवार यावेळी म्हणाले.
17 एप्रिल 1999 रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या विरोधातील अविश्वास ठरावावर लोकसभेत मतदान झाले. त्या मतदानात वाजपेयी सरकारच्या बाजूनं 269 तर विरोधात 270 मतं पडली होती. त्यामुळे अवघ्या एका मतानं वाजपेयी सरकार पडलं. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विरोधी पक्षाला सरकार जुळवण्यासाठी आवश्यक खासदारांची संख्या जुळवता आलेली नाही. त्यामुळे 1999 साली पुन्हा एकदा लोकसभेेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world