Prateek Yadav Passes Away: उत्तर प्रदेशच्या राजकारणात अनेक दशके वर्चस्व गाजवणाऱ्या मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबातील एक गूढ आणि वादळी व्यक्तिमत्व म्हणजे प्रतीक यादव. प्रतीक यादव यांच्या अकाली निधनामुळे त्यांचं वैयक्तिक आयुष्य हे चर्चेत आलं आहे. एका शक्तिशाली राजकीय घराण्यात जन्म घेऊनही प्रतीक यांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले, मात्र तरीही ते अनेकदा कौटुंबिक वादाच्या केंद्रस्थानी राहिले.
गुपित नाते आणि ओळखीचा संघर्ष
प्रतीक यादव यांचा जन्म 1988 मध्ये झाला.ते साधना गुप्ता आणि मुलायम सिंह यादव यांचे चिरंजीव होते. मात्र, अनेक वर्षे हे नाते जगापासून लपवून ठेवण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात प्रतीक हे साधना गुप्ता यांचे पहिले पती चंद्रप्रकाश गुप्ता यांचे पुत्र असल्याचे मानले जात असे.
इतकेच नव्हे तर त्यांच्या शालेय कागदपत्रांवर वडिलांचे नाव देखील स्पष्ट नव्हते. प्रतीक यांचे आयुष्य 2003 साली पूर्णपणे बदलले. त्यावर्षी मुलायम सिंह यांच्या पहिल्या पत्नी मालती देवी यांचे निधन झाले. त्यानंतर मुलायम सिंह यांनी साधना गुप्ता आणि प्रतीक यांच्याशी असलेले आपले नाते अधिकृतपणे स्वीकारले.
( नक्की वाचा : NEET Paper Leak : रात्री 11 चा 'तो' मेसेज अन् संपूर्ण 'नीट' परीक्षा रद्द! हॉस्टेल मालकाने नेमकं काय पाहिलं? )
सत्तेचा संघर्ष आणि दोन गट
मुलायम सिंह यांनी हे नाते मान्य केल्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात आणि यादव कुटुंबात मोठी खळबळ उडाली. समाजवादी पार्टीमध्ये अनौपचारिकपणे दोन गट पडले. एक गट अखिलेश यादव यांच्या बाजूने होता, तर दुसरा गट साधना गुप्ता यांच्या प्रभावाखाली होता.
प्रतीक राजकारणात नसले तरी, साधना गुप्ता, मुलायम सिंह यांचे बंधू शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्यातील सत्तासंघर्षात त्यांचे नाव वारंवार ओढले गेले. 2012 मध्ये त्यांना आझमगडमधून निवडणूक लढवण्यासाठी सासरच्या मंडळींकडून आणि पक्ष कार्यकर्त्यांकडून दबाव आला होता, परंतु त्यांनी फिटनेसमधील स्वत:ची आवड आणि रिअल इस्टेट व्यवसायालाच प्राधान्य दिले.

अपर्णा यादव यांचा प्रवेश आणि राजकीय वळण
प्रतीक यादव यांनी 2011 मध्ये अपर्णा बिष्ट यांच्याशी विवाह केला. अपर्णा आणि प्रतीक यांचे प्रेमप्रकरण 8 वर्षे चालले होते. मात्र, 2022 साली त्यांच्यातील कौटुंबिक कलह उफाळून आला होता. अपर्णा यादव यांनी 2022 मध्ये समाजवादी पार्टी सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या धोरणांचे कौतुक करत अखिलेश यादव यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. यामुळे यादव कुटुंबातील राजकीय दरी अधिकच रुंदावली आणि या वादाचे खापर अनेकदा प्रतीक यांच्या पत्नी आणि आईवर फोडले गेले.
कौटुंबिक कलह आणि सोशल मीडियावरील वाद
प्रतीक यादव यांचे वैयक्तिक आयुष्य गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत तणावाखाली होते. जानेवारी 2025 मध्ये त्यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या पत्नीबद्दल अत्यंत गंभीर आरोप केले होते. अपर्णा यांनी कौटुंबिक संबंध बिघडवले असून त्या केवळ प्रसिद्धीच्या मागे असल्याचा दावा करत त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती.
मात्र, काही दिवसांनंतर 28 जानेवारी रोजी त्यांनी पुन्हा एकत्र आल्याचे जाहीर केले. हा सर्व मानसिक ताण आणि कौटुंबिक विसंवाद त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला होता.
( नक्की वाचा : NEET paper leak : नाव मेडिकलला, पण कनेक्शन पेपर लीकच्या टोळीशी! नाशिकच्या शुभम खैरनारची 'कुंडली' आली समोर )
अकाली निधन आणि अखिलेश यादव यांची श्रद्धांजली
वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी प्रतीक यादव यांनी बुधवारी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. जरी अखिलेश यादव आणि प्रतीक यादव यांचे मार्ग वेगळे होते, तरीही प्रतीक यांच्या निधनानंतर अखिलेश यादव यांनी अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली. प्रतीकचे निधन अत्यंत हृदयद्रावक असल्याचे सांगत त्यांनी आपल्या धाकट्या भावाला श्रद्धांजली वाहिली. एका राजघराण्यातील गुपित वारसदार ते वादाच्या भोवऱ्यात सापडलेला तरुण, असा प्रतीक यादव यांचा प्रवास आता कायमचा थांबला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world