राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. भारताला खरे स्वातंत्र्य 1947 साली नाही तर अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर मिळाले अशा आशयाचे विधान भागवत यांनी केले होते. यावरून राहुल गांधी यांनी कडाडून टीका केली. काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचे 15 जानेवारी रोजी राहुल गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, मोहन भागवत यांचे हे विधान म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. त्यांचे हे विधान स्वातंत्र्य सैनिकांसह प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मोहन भागवत दर 2-3 दिवसांनी आपल्या भाषणातून त्यांचे भारताचा स्वातंत्र्य लढा, संविधानाबद्दलचे त्यांचे विचार काय आहेत हे सांगत असतात. नुकतेच त्यांनी जे विधान केले ते देशद्रोही विधान आहे. कारण त्यांच्या विधानाचा अर्थ असा होतो की, संविधानाचे काहीही औचित्य नाही, इंग्रजांना देशातून हाकलून देण्यासाठीच्या स्वातंत्र्य लढ्याचे काहीही महत्त्व नाही. सरसंघचालकांनी म्हटले होते की, अयोध्येत प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस हा प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा केला गेला पाहिजे. कारण याच दिवशी अनेक आक्रमकांनी केलेली आक्रमणे झेलल्यानंतर देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले होते.