Rajasthan News : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये एका सरकारी अभियंत्याच्या घरी झालेल्या एका अनोख्या चोरीची ही घटना सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एका चोरट्याने चक्क सरकारी अभियंत्याच्या घरात चोरी केली, पण चोरी करण्यापेक्षा त्याने घरातून निघताना जे काही केलं आणि जी चिठ्ठी लिहिली, त्याचीच जास्त चर्चा होत आहे.
नेमकं काय घडलं?
जैसलमेरमधील एका सरकारी सहाय्यक अभियंत्याच्या सरकारी निवासस्थानी ही चोरी झाली. अभियंता कामानिमित्त बाहेर गेले होते, तेव्हा चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील मौल्यवान वस्तू चोरल्यानंतर चोरट्याची नजर तिथे असलेल्या एका महागड्या दारूच्या बाटलीवर पडली. चोरट्याने घरातील ती दारूची बाटली काढली आणि आरामात बसून दारू प्यायला. मात्र, दारू सोबत खाण्यासाठी घरात 'चखना' नसल्यामुळे तो चांगलाच संतापला. चिडलेल्या चोरट्याने मालकासाठी एक चिठ्ठी लिहिली. त्याने लिहिलं, "दारू ठेवता, तर सोबत बटाटा चिप्स (चखना) सुद्धा ठेवत जा!"
नक्की वाचा - Gig workers: ऑनलाइन डिलिव्हरी ठप्प! देशभरात काम बंद; गिग कामगारांची सर्वात मोठी घोषणा
चिठ्ठीतून डायलॉगबाजी...
चोरटा एवढ्यावरच थांबला नाही, त्याने चिठ्ठीत काही फिल्मी डायलॉग लिहिले. केवळ त्याने चिठ्ठीच लिहिली नाही तर त्याने लिपस्टिकने भिंतीवरही काही डायलॉग लिहिले.
"मला शोधत राहाल, पण हा बिहारी बाबू कधीच सापडणार नाही. जर पोलिसात तक्रार केलीस तर मी तुझा सर्वात मोठा शत्रू होईल. तू मला विसरून जा, मी तुला विसरून जाईन."
"तुझ्या सुंदर पेनने मी हे लिहित आहे. मी तुझ्या घरातलं अन्न खाल्लयं, मजा आली. अपरिहार्यतेमुळे पहिल्यांदा असं काम करावं लागत आहे. जिवंत राहिलो तर तुझे उपकार विसरणार नाही. धन्यवाद - बिहारी बाबू."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world