आग, धूर आणि किंकाळ्या! 35 जणांचा मृत्यू, मृतांची ओळख पटवण्यासाठी करणार DNA टेस्ट

Rajkot Gaming Zone Fire Incident : राजकोटमधील अग्नितांडवानंतर गुजरात सरकार जाग झाले आहे. यानंतर अन्य गेम झोनची देखील तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

Rajkot Gaming Zone Fire Incident : गुजरातच्या राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढत आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. कित्येक जण बेपत्ता असल्याचेही म्हटले जात आहे. पण शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना घडल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. शनिवारी (25 मे 2024) संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान "टीआरपी गेम झोनचे मालक आणि व्यवस्थापकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे", अशी माहिती राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी दिलीय. आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

Advertisement

(नक्की वाचा : Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणात मोठी कारवाई, मुख्य आरोपीला अटक)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' वर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे. PM मोदी म्हणाले की,'राजकोटमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेमुळे खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या जवळील लोकांना गमावले आहे, त्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींसाठी मी प्रार्थना करतोय. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत".  

Advertisement

( नक्की वाचा : Dombivli MIDC Blast स्फोटानं हादरलं साईबाबा मंदिर, साखरपुड्यात पळापळ, Video )

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी पीडितांना तातडीने मदत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले, "राजकोटमधील गेम झोनमध्ये आग लागल्याच्या घटनेत महापालिका आणि प्रशासनाला तात्काळ बचाव व मदत कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत." अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये तर जखमींसाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली गेली आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी अहमदाबादमधील 40 डॉक्टरांचे पथकही राजकोटमध्ये पोहोचले आहे. 

Advertisement

अन्य गेम झोनची तपासणी  

दरम्यान, गुजरातच्या पोलीस महासंचालकांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना राज्यातील सर्व गेम झोनची तपासणी करण्याचे तसेच अग्निसुरक्षा परवानगीशिवाय सुरू असणारे गेम झोन तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. पालिका आणि नगरपालिकांचे अग्निशमन अधिकारी तसेच स्थानिक यंत्रणांच्या समन्वयाने ही प्रक्रिया पार पाडण्यास सांगितले गेले आहे.  

(नक्की वाचा: पुण्याच्या दुर्घटनेची मुंबईत पुनरावृत्ती, अल्पवयीन बाईकस्वाराच्या धडकेत तरुणाचा मृत्यू)

ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट

रिपोर्ट्सनुसार या प्रकरणी गुन्हे शाखेने चार जणांना ताब्यात घेतले आहे. टीआरपी गेम झोनचा मालक युवराज सिंग सोलंकी, त्याचा पार्टनर प्रकाश जैन, व्यवस्थापक नितीन जैन आणि राहुल राठोड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

दुसरीकडे राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 27 मृतदेह पोस्टमार्टेमसाठी दाखल करण्यात आले आहेत. मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जात आहे. याकरिता मृतांच्या नातेवाईकांचेही डीएनए सॅम्पल घेण्याचे काम सुरू आहे.

हेल्पलाइन क्रमांक  

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेम झोन अग्नितांडवामधील मृत्युमुखी पडलेले तसेच जखमी झालेल्या नागरिकांची माहिती जाणून घेण्यासाठी +917698983267 आणि +919978913796 हे हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. 

Gujarat | राजकोटमध्ये अग्नितांडव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Topics mentioned in this article