
Success story IPS Safin Hasan : ''लहरों से डर कर नौका पार नहीं होती, हिम्मत करने वालों की कभी हार नहीं होती.....''
हरिवंश राय बच्चन यांची ही कविता देशातील सर्वात तरुण IPS अधिकारी सफीन हसन यांना चपखल लागू होते. त्यांचा संपूर्ण प्रवास हा प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न बघत या परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
कसा झाला प्रवास?
सफिन हसन यांचा जन्म 1995 मध्ये गुजरातमधील पालनपूर येथील एका कामगार कुटुंबात झाला. 2018 मध्ये त्यांनी वयाच्या 22 व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. एक अधिकारी होण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचे आई-वडील हिऱ्यांच्या उद्योगात काम करत होते. पण 2000 मध्ये काही कारणांमुळे दोघांची नोकरी गेली. त्यानंतर आईने दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकाचे काम सुरू केले आणि वडील विटा वाहण्याचे काम करू लागले. इतकंच नाही तर घरखर्च चालवण्यासाठी दोघंही संध्याकाळी हातगाडीवर उकडलेली अंडी विकायचे.
या सर्व अडचणींमध्ये अधिकारी बनण्याचं सफिन हसन यांचं स्वप्न पूर्ण करणं हे एक मोठं आव्हान होतं. पण त्यांनी आपल्या मनातील जिद्द कमी होऊ दिली नाही आणि प्रयत्न करत राहिले. या कठीण काळात सफिन यांच्या शाळेने त्यांना खूप मदत केली. त्यांच्या 11वी आणि 12वीची फी माफ केली. 12वी पास झाल्यावर सफिन हसन यांनी नातेवाईकांच्या मदतीने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि आपला अभ्यास सुरू ठेवला.
( नक्की वाचा : 2 लाख महिना! इंटर्नशिपमध्येच करा छप्परफाड कमाई, पदवी किंवा अनुभवाचीही गरज नाही! 'या' पद्धतीनं करा अर्ज )
परीक्षेला जाताना अपघात....
पण 2017 मध्ये त्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल घडला. 2017 मध्ये जेव्हा हसन UPSC ची परीक्षा द्यायला जात होते, तेव्हा त्यांचा अपघात झाला, ज्यात ते गंभीर जखमी झाले. पण सफिन यांनी जखमी अवस्थेतच परीक्षा दिली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या संपूर्ण कालावधीत त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. त्यांच्यावर फिजिओथेरपीचे उपचार करण्यात आले. काही दिवसांनी UPSC चा निकाल लागला, ज्याने त्यांच्या सर्व वेदना आणि दु:ख हलके झाले. सफिन यांनी UPSC परीक्षेत वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी ऑल इंडियामध्ये 570 वा क्रमांक मिळवून सर्वात तरुण IPS अधिकारी बनण्याचा मान मिळवला.
म्हणतात ना, जेव्हा तुमचे मनोधैर्य आणि इच्छाशक्ती मजबूत असते, तेव्हा मोठ्या मोठ्या अडचणी तुमच्यासमोर झुकतात. आज, सफिन त्यांच्या प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट योगदान देत आहेत आणि देशभरातील लाखो तरुणांसाठी ते एक आदर्श आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world