
रामराजे शिंदे, नवी दिल्ली
Independence Day : भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा यंत्रणांनी मोठा इशारा जारी केला आहे. खलिस्तानी दहशतवादी संघटना 'शीख फॉर जस्टिस' 15 ऑगस्ट रोजी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी हल्ल्याचा कट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडून दिल्लीला लक्ष्य करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा आणला जात आहे. यामध्ये AK47, RDX आणि हँडग्रेनेड यांसारख्या घातक शस्त्रांचा समावेश आहे. सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्या सूचनेनुसार हे स्लीपर सेल दिल्लीतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
(नक्की वाचा- अंबानींचे हेलिकॉप्टर क्रॅश करण्याचा कट, आजपर्यंत सापडला नाहीये मास्टरमाईंड)
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, 15 ऑगस्टच्या निमित्ताने हे स्लीपर सेल लाल किल्ला आणि संवेदनशील भागातील मेट्रो स्थानकांवर खलिस्तान समर्थक घोषणा लिहून दहशत निर्माण करण्याचा कट रचत आहेत. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दिल्लीतील संवेदनशील ठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
(नक्की वाचा- Trump Tariffs : भारताला अमेरिकेचा धक्का, 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ; या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसणार)
या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी त्यांच्या सर्व जिल्ह्यांना, तसेच गुन्हे शाखेच्या विशेष कक्षाला सतर्क ठेवले आहे. शीख फॉर जस्टिसच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्पेशल सेलकडे देण्यात आली आहे. संभाव्य हल्ल्याचा कट हाणून पाडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून, प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world