बेटिंग अ‍ॅप, दारूचं व्यसन ठरलं वृद्ध महिलेच्या हत्येचं कारण; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

आशा यांच्या गळ्यातील चेन, कानातले चोरीला गेल्याचं समोर आलं होतं. दरम्यान या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
डोंबिवली:

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये शुक्रवारी, 14 जून रोजी आशा रायकर या 65 वर्षांच्या महिलेची राहत्या घरात गळा आवळून हत्या करण्यात आल्याची  बातमी समोर आली होती. यावेळी आशा यांच्या गळ्यातील चेन, कानातले चोरीला गेल्याचं समोर आलं होतं. दरम्यान या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. हत्येपूर्वी बाहेरील कोणतीही व्यक्ती इमारतीत आलं नव्हतं, हे सीसीटीव्हीवरून स्पष्ट झालं होतं. त्यामुळे पोलिसांनी इमारतीमधील रहिवाशांची चौकशी सुरू केली. यावेळी पोलिसांनी बेरोजगार, दारूचं व्यसन आणि संशयास्पद रहिवाशांची यादी केली. यासर्वांची चौकशी सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरील यश विचारे याचा जबाब पोलिसांना संशयास्पद वाटला. त्यामुळे पोलिसी खाक्या दाखवत त्याची विचारपूस करण्यात आली. यावेळी त्याने आपणच गुन्हा केल्याचं कबुल केलं. या हत्येमागे त्याने दिलेलं कारण धक्कादायक असून या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 

क्रिकेट बेटिंगमध्ये 60 हजार हरला..
यशला दारूसह सट्टा लावण्याचंही व्यसन होतं. तो काही दिवसांपूर्वी क्रिकेटच्या बेटिंगमध्ये 60 हजार रूपये हरला होता. यासाठी त्याने आशा रायकर यांच्या घरात घुसून त्यांची गळा दाबून हत्या केली आणि यानंतर त्यांची चेन आणि कानातले चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

नक्की वाचा - कोल्हापुरात इन्स्टाग्राम रीलमुळे तरुणाची हत्या; टोळक्याचा एडका-तलवारीने हल्ला

सोन्याची चेन निघाली खोटी...
बेटिंग अॅपमधील पैसे हरल्यानंतर यशने आशा रायकर यांची हत्या करून त्यांची चेन आणि कानातले चोरले. मात्र सोन्याचे दागिने विकायला गेल्यावर ती चेन खोटी असल्याचं समोर आलं. कानातल्याचे त्याला 17 हजार रूपये मिळाल्याचं यशने पोलिसांना सांगितलं. 

Advertisement

त्या मेसेजमुळे संशय वाढला...
यश विचारे (27 वर्षे) या तरूणाला दारूचं व्यसन होतं. याशिवाय तो बेरोजगारही होता. तो आईसोबत राहत होता. त्याचा भाऊ युकेमध्ये नोकरीला होता. आशा रायकर यांचा मृत्यू झाला त्याच दिवशी यशने त्याच्या मित्रांना एक मेसेज केला होता. या मेसेजमुळे मोठा खुलासा झाला. त्याने मित्रांना दारू पार्टीसाठी बोलावलं होतं. आशा रायकर यांचे सोन्याचे कानातले विकल्यानंतर आलेल्या 17 हजार रूपयातून त्याने पार्टी करण्याचं ठरवलं होतं.