जाहिरात

कोल्हापुरात इन्स्टाग्राम रीलमुळे तरुणाची हत्या; टोळक्याचा एडका-तलवारीने हल्ला

सुजल कांबळे असं मृत तरुणाचं नाव आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशीरा 4 ते 5 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

कोल्हापुरात इन्स्टाग्राम रीलमुळे तरुणाची हत्या; टोळक्याचा एडका-तलवारीने हल्ला

विशाल पुजारी, कोल्हापूर

कोल्हापुरात इन्स्टाग्राम रीलच्या वादातून हत्येची घटना घडली आहे. पूर्ववैमनस्य आणि इंस्टाग्रामवरील रील्स यातून एकमेकांना खुन्नस दिल्याप्रकरणी कोल्हापुरात तरुणाचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. टिंबर मार्केट परिसरात 20 वर्षीय तरुणावर एडक्याने आणि तलवारीने आठ ते दहा जणांनी सपासप वार करून खून केला. ही थरारक घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. सुजल कांबळे असं मृत तरुणाचं नाव आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशीरा 4 ते 5 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

(नक्की वाचा- कोकणात पीपीई किट घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार, नेमकं काय घडलं?)

गेल्या दोन वर्षांपासून राजेंद्रनगर येथील कुमार गायकवाड आणि अमर माने या दोघांच्या टोळीत वाद आहे. हा वाद हळूहळू वाढत गेला. वारे वसाहत परिसरात या वादाची चर्चा जोरदार चर्चा होती. दरम्यान मध्यंतरीच्या काळात कुमार गायकवाड यांचा खून झाला. या खुनानंतर गायकवाडच्या टोळीतील सदस्य अमर माने या टोळीच्या मागावर होते.

इथूनच या दोन टोळीत सोशल मीडिया वॉरची सुरुवात झाली. सुजल कांबळे याने सोशल मीडियावर गायकवाडच्या टोळीला खुन्नस देत एक रील शेअर केली होती. यानंतर गायकवाड टोळीकडून आठ ते दहा जणांनी टिंबर मार्केट परिसरात सुजलचा तलवारीने वार करून खून  केला.

(वाचा - महाराष्ट्रातील विदारक चित्र; जिथं पर्यटक घ्यायचे बोटिंगचा आनंद, तिथं भेगाळलेल्या जमिनीवरून माणसांची पायपीट)

सुजल गुरुवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून कोल्हापुरात फेरफटका मारत होता. संभाजीनगरकडे जात असताना टिंबर मार्केट परिसरातील म्हसोबा मंदिर येथे पाऊस आल्याने तो थांबला होता. याच दरम्यान तीन दुचाकीवरून आलेल्या 8 ते 10 जणांनी सुजलवर आणि त्याच्या मित्रांवर हल्ला चढवला. सुजल तिथून पळ काढून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

मात्र हल्लेखोरांनी सुजलवर एडका आणि तलवारीने सपासप वार केले. त्याच्या हातावर आणि पाठीवर मोठ्या प्रमाणात वार करण्यात आले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या मित्रांना त्याला रुग्णालयात नेले मात्र तिथे डॉक्टरांना त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com