- धनबाद जिल्ह्यातील बाघमारा परिसरात जमीन खचल्याने दहा घरे जमिनीखाली गडप झाली
- स्थानिकांनी मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज ऐकला आणि त्यानंतर जमीन हलू लागली
- कोळसा खाणींच्या चुकीच्या उत्खननामुळे अशा दुर्घटना वारंवार होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला
झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील बाघमारा परिसरात शुक्रवारी 24 एप्रिल सायंकाळी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. टंडाबाडी वस्तीत अचानक जमीन खचली. त्यात पाहता पाहता 10 घरे जमिनीच्या पोटात गडप झाली. या भीषण घटनेत 4 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत एक मारुती कार आणि मोटारसायकलही ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे. या निसर्गाच्या कोपाने संपूर्ण गावकरी हादरले आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढे काय होईल ही भीती त्यांना सतावत आहे.
स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी उशिरा मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. त्यानंतर जमीन हलू लागली. काही सेकंदातच वस्तीतील घरे जमिनीच्या आत धसू लागली. आपला जीव वाचवण्यासाठी नागरिक घराबाहेर पळाले. ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पीडित मनोज सिंह यांनी सांगितले की, "आम्ही जेवण बनवत असताना अचानक मोठ्या स्फोटाचा आवाज झाला. त्यानंतर बाहेर येऊन पाहिले तर शेजारची 10 घरे गायब झाली होती." ती जमिनीत गाडली गेली होती असं त्यांनी सांगितलं.
घटनेची माहिती मिळताच धनबाद जिल्हा प्रशासन आणि भारत कोकिंग कोल लिमिटेडचे (BCCL) अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, स्थानिक रहिवाशांनी त्यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोळसा खाणींच्या चुकीच्या उत्खननामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या जखमींना असर्फी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मदतकार्य सुरू आहे. कोळसा खाणी विरोधात गावकऱ्यांमध्ये सध्या मोठा रोष पाहायला मिळत आहे. भवीष्यात ही अशी घटना घडू शकतात अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या परिसरात अद्यापही जमिनीला तडे जात असून सुमारे 100 घरांवर धोका निर्माण झाला आहे. या भागात जमिनीखालून विषारी वायूची गळती देखील होत आहे. प्रशासनाने यापूर्वी अनेकदा वस्ती रिकामी करण्याचे आवाहन केले होते. परंतु योग्य पुनर्वसन आणि नुकसान भरपाई मिळत नसल्याने नागरिक तिथेच वास्तव्यास होते. आता सर्वस्व गमावलेल्या या कुटुंबांनी सुरक्षित ठिकाणी निवारा आणि कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली आहे. ती वेळत पूर्ण झाली नाही तर मृत्यूचे सावट या गावकऱ्यांवर असेल. त्यामुळे गावकरी ही आता आक्रमक झाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world