2024 मध्ये काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित दुर्घटनांनी त्यांच्या कटू आठवणींची छाप सोडली. यंदा तरी जगातील युद्धबंदी होईल अशी शक्यता होती. मात्र रशिया युक्रेन युद्धाला हजार दिवस थोडक्यात अडीच वर्ष उलटूनही ते थांबलं नाही. शिवाय इस्त्रायल-हमास युद्धाला दीड वर्ष उलटून तेही थांबलेलं नाही. या दोन युद्धांची जग फार मोठी किंमत मोजतोय. हे कमी की काय, ग्लोबल वॉर्मिंगचे चटके आणि झटकेही 2024 ने सोसले. एका अहवालानुसार, भारतात 2024 मध्ये 2023च्या तुलनेत नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटनांनी झालेल्या मृतांमध्ये तब्बल 18 टक्क्यांची वाढ दिसली.
नक्की वाचा - Year Ender 2024 : सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी, गुंतवणूकदार झाले मालामाल
पाहूया 2024 मधले 24 प्रलय...
१. 2024चा पहिलाच दिवस हादरला तो जपानमधल्या भूकंपानं. इशिकावा या द्वीपावर 7.2 च्या तीव्रतेनं झालेल्या भूकंपानं तब्बल 400 हून अधिक जणांचा बळी घेतला तर 2 बिलियन डॉलर्सहून अधिक मालमत्तेचं नुकसान झालं. तर या भूकंपानंतर समुद्र किनाऱ्याचा 85 किमीचा भाग उंचावला गेला तर किनारा दोनशे मीटरपर्यंत समुद्राकडे सरकला अशी माहिती अभ्यासकांनी दिली.
२. दुसऱ्याच दिवशी जपानच्या टोकियो विमानतळावर दोन विमानांच्या अपघातानं जपानसह साऱ्या जगात खळबळ उडाली. लँडिंग करणारं प्रवासी विमान धडक लागल्यानंतर पेटलं आणि ते तसंच धावपट्टीवर धावत राहिलं. या विमानात क्रूमेंबर्ससह 379 प्रवासी होते. मात्र आश्चर्यकारकरित्या सारेजण बचावले. अवघ्या 90 सेकंदांत हे प्रवासी बचावले ते क्रू मेंबर्सच्या सतर्कतेमुळे. मात्र भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी उड्डाणाला सज्ज असलेल्या कोस्टगार्डच्या विमानातील सहापैकी 5 जवानांचा मृत्यू झाला.
३. ग्लोबल वॉर्मिंग आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका यंदा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला बसला. मार्चपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं आलेल्या पूरानं तब्बल सहा महिने या दोन्ही देशांना रडवलं. अफगाणिस्तानच्या 23 प्रांतांना या पुराचा फटका बसला. यात तब्बल हजारहून अधिक नागरिकांचे बळी गेले तर पाकिस्तानात ही पुराचा कहर पाहायला मिळाला. स्वात प्रांतात झालेल्या भूस्खलनाने 40 जणांचा बळी घेतला तर त्यानंतर खैबर पख्तुनख्वासह इतर काही प्रांतातल्या पुरामुळे जवळपास 200 हून अधिक जणांचे बळी गेले.
नक्की वाचा - Year Ender 2024 : T20 वर्ल्ड कप विजेतेपद ते अश्विनची रिटायरमेंट, कसं गेलं भारतीय क्रिकेटसाठी वर्ष?
४. गेल्या ८० वर्षांतील सर्वाधिक संहारक पूर यंदा ब्राझिलनं पाहिला. रिओ ग्रांदे डो सुल राज्यातील पोर्टो अलेग्रे शहराला पुराचा सर्वाधिक फटका बसला. २८ एप्रिल पासून ३०० नगर पालिकांना पुरानं हैराण केलं. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांची पात्र ओलांडली आणि ब्राझीलकरांनी कधीही अनुभवला नाही असा पूर आला. या पुरामुळे दीडशेहून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले.
५. २४ जुलै रोजी नेपाळमध्ये खळबळ उडाली ती भीषण विमान अपघातानं. राजधानी काठमांडूच्या विमानतळावरून १९ प्रवाशांना घेऊन विमानानं टेक ऑफ केलं. मात्र काही क्षणातच विमान क्रॅश झालं आणि त्यात १९ पैकी १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. केवळ पायलट बचावला मात्र तोही गंभीर जखमी अवस्थेतच हाती लागला. सौर्य एअरलाईन्सचं हे विमान काठमांडूवरून पोखराला जात होतं.
६. २०१७ नंतर सर्वाधिक संहारक चक्रीवादळ सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या फ्लोरिडाला धडकलं. त्याचं नाव हेलेन. श्रेणी ४ मधील हे वादळ होतं. या वादळामुळे तब्बल २०० हून अधिक नागरिकांचे बळी गेले. २६ सप्टेंबरला हेलेन चक्रीवादळ फ्लोरिडाला धडकलं. १२० अब्ज युएस डॉलर्सच्या मालमत्तेचं यात नुकसान झालं. राहील
७. तर सप्टेंबरमध्ये दक्षिण आशियामध्ये यागी वादळानं धुमाकूळ घातला. थायलंड, व्हिएतनाम, म्यानमार, लाओस या देशांना यागीचा तडाखा बसला. आशियातील आतापर्यंतच्या सर्वाधिक शक्तीशाली वादळामुळे या देशांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारा आणि भूस्खलनाच्याही घटना घडल्या. व्हिएतनामला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. तब्बल तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी गेला. मालमत्तेचही भयंकर नुकसान झालं. नेपाळमध्येही याच महिन्यात पुरामुळे २०० जणांचा मृत्यू झाला.
८. युरोपातही पुरानं यंदा थैमान घातलंय. सर्वाधिक फटका बसला तो स्पेनला. स्पेनमध्ये ऑक्टोबरमध्ये आलेल्या पुरामुळे २०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला. २८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या पावसामुळे महापूर आला आणि अनेक ठिकाणी पूल वाहून गेले. मुलभूत सुविधांची दैना उडाली. अन्न पाण्यासह विजेचा तुटवडा निर्माण झाला.
९. गेल्यावर्षी सुरू झालेल्या इस्त्रायल-हमास युद्धात यंदा एक भयंकर धक्कातंत्र पाहायला मिळालं. १७ सप्टेंबरला सीरिया लेबनॉन पेजर ब्लास्टनं हादरले. हिजबुल्लानं त्यांच्या सदस्यांना मोबाइल फोन न वापरता पेजर वापरण्याचे आदेश दिले. मात्र पेजरची यंत्रणाच हॅक करून स्फोट घडवण्यात आले. यात लहान मुलांसह नऊ जण ठार झाले. दुसऱ्याच दिवशी वॉकी टॉकीमध्ये स्फोट झाले. तब्बल २५ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला.
१०. दरम्यान, इस्त्रायलनं हमासचा पूर्ण बिमोड केल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार केलाय. ७ ऑक्टोबर २०२३च्या हल्ल्याचा मास्टर माईंड याह्या सिनवार हा मारला गेल्याचा दावा इस्त्रायलनं केलाय. इतरही १६ बडे नेते मारल्याचा इस्त्रायलचा दावा आहे. तर तब्बल अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेलं रशिया युक्रेन युद्धही संपण्याची चिन्हं दिसत नाही. जवळपास ३४ महिनांनंतरही शांतता प्रस्थापित झालेली नाही. आतापर्यंत दोन्ही बाजूचे ८० हजाराहून अधिक सैनिक मारले गेलेत. तर तीस हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय.
११. २४ मे २०२४ रोजी पापुआ न्यू गिनीमध्ये झालेलं भूस्खलन प्रचंड संहारक ठरलं. तब्बल दोन हजार नागरिक या भूस्खलनात गाडले गेले असा अंदाज आहे. अधिकृत आकडेवारीनुसार यात ६७० नागरिकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात असलं तरी खरा आकडा हजारोंच्या घरात आहे. एंगा इथं झालेलं भूस्खलन हे अतिवृष्टीमुळे झालं असं सांगितलं जातं. मात्र १८ मे रोजी एंगाच्या आजूबाजूच्या परिसरात आलेला भूकंप या भूस्खलनामागचं कारण सांगितलं जातंय.
१२. आफ्रिका खंडातील गिनिआ देशात एक डिसेंबरला चक्क फूटबॉल मॅचमध्ये जोरदार राडा झाला. यात तब्बल १०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. दोन टीमच्या फुटबॉल फॅन्समध्ये जोरदार हाणामारी झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाल्यानं परिस्थिती बिकट झाली. अनेक जणांनी स्टेडीयमची भिंत ओलांडत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तर अनियत्रित झालेल्या गर्दीनं काही मालमत्तांचं नुकसानही केलं.
2024 मधील भारतातील हादरवणाऱ्या घटना...
१. भारतात एक मार्च रोजी सारा देश हादरला तो कर्नाटकच्या बंगळुरूमधल्या एका नामांकित कॅफेमधल्या बाँबस्फोटानं. रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या या स्फोटात सुमारे अकरा जण जखमी झाले. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. मात्र भरदिवसा वर्दळीच्या वेळी आयईडी स्फोट झाल्यानं एकच खळबळ उडाली. याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून काही धक्कादायक खुलासेही झाले.
२. १३ मे रोजी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनं केवळ राज्यातच नव्हे तर देशभरातच खळबळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या वादळी पावसामुळे मुंबईतल्या घाटकोपरच्या छेडानगरमध्ये भलंमोठे होर्डिंग कोसळलं आणि आडोशाला उभ्या असलेल्या १७ जणांचा बळी घेतला. याशिवाय ७५ जण जखमी झाले.
३. 25 मे रोजी गुजरातच्या राजकोटमधील अग्नितांडवानं सारा देश हळहळला. या आगीत ३३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या गेमिंग झोनमध्ये जवळपास ७० ते ८० लोक अडकले होते. यात मुलांसह पालकही आले होते. आग लागली त्यापूर्वी एअर कंडीशनमध्ये स्फोट झाला होता असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तर तात्पुरतं उभारण्यात आलेल्या या मनोरंजन पार्कमध्ये जनरेटरसाठी तब्बल २ हजार लिटर पेट्रोलचा साठा करण्यात आला होता. पत्र्याच्या भल्या मोठ्या शेडमध्ये हे दोन मजली गेमिंग पार्क उभारण्यात आलं होतं. त्यातच राजकोटचं तापमान या सर्व कारणांमुळे ही आग अनियंत्रित झाली.
४. ३ जून २०२४ रोजी उत्तराखंडमध्ये हिमवादळ आलं आणि नऊ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. २९ मेला कर्नाटकच्या बंगळुरुमधील २२ ट्रेकर्सनं त्यांच्या मोहिमेला सुरुवात केली होती. उत्तराखंडच्या दुर्गम भागातील सहस्त्रा ताल इथं त्यांना पोहोचायचं होतं. मात्र त्याआधीच जोरदार हिमवादळ आणि हिम वृष्टीत ते सारे अडकले. वादळ शांत झाल्यानंतर इतर १३ गिर्यारोहकांना वाचवण्यात यश आलं.
५. नऊ जून रोजी जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये यात्रेकरूंच्या एका बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हल्ल्यानंतर बस दरीत जाऊन कोसळली होती. नऊ यात्रेकरूंचा यात मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले होते. त्यानंतर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. तर दोन दहशतवादी ठार झाले.
६. १७ जून २०२४ रोजी पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात दोन रेल्वेगाड्यांची समोरासमोर टक्कर झाली. रंगपानी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीची सियालदह-आगरताळा कांचनजंगा एक्स्प्रेस या पॅसेंजर ट्रेनला धडक बसली. या भीषण अपघातात सुमारे ११ जणांचा मृत्यू झाला तर ६० हून अधिक जण जखमी झाले.
७. २ जुलै २०२४ रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल १२१ भाविकांचा मृत्यू झाला. हरी भोले बाबा नावाच्या एका बाबाच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी अपुरी जागा, प्रंचड गर्दी आणि योग्य नियोजनाचा अभाव या कारणांमुळे चेंगराचेंगरी झाली आणि १२१ भाविकांनी जीव गमावला. याप्रकरणी आयोजकासह ११ आरोपींविरोधात खटला सुरू झाला मात्र खुद्द हरी भोले बाबाचं आरोपपत्रात नावही नव्हतं.
८. १६ जुलैला कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला इथं भूस्खलन झालं.राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ६६ वर मातीचा मोठा ढिगारा वाहून आला आणि त्यात नऊ जणं गाडली गेली. बांधकाम कार्य आणि अतिमुसळधार पावसामुळे हे भूस्खलन झालं. दरम्यान, कर्नाटकात यावर्षी भूस्खलनाच्या छोट्या मोठ्या ४६ घटना घडल्यात.
९. ३० जुलै रोजी केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनानं सारा देश हादरला. या भूस्खलनात दोन गावं गाडली गेली तब्बल ४२० जणांचा मृत्यू झाला तर ३९७जण जखमी झाले. अनेक जण बेपत्ता झाले. मुसळधार पावसामुळे जरी हे भूस्खलन झाल्याचं बोललं जात असलं तरी पर्यटनाच्या नावाखाली झालेली बांधकामं आणि जमीन समतल करण्याचा प्रयत्न ही या भूस्खलनामागील महत्त्वाची कारणं मानली जातात.
१०. ३० जुलैला आलेल्या महाभयंकर पुरामुळे दिल्ली स्तब्ध झाली. याला कारण ठरलं ती ओल्ड राजेंद्र नगरमधील एका अभ्यासिकेतील दुर्घटना. इथल्या एका स्टडी सर्कलच्या इमारतीच्या बेसमेंट मध्ये पुराचं पाणी शिरलं आणि यात यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. पुराचं पाणी बेसमेंटमध्ये शिरू लागताच विद्यार्थ्यांना बाहेर येण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तीन विद्यार्थी त्यातून बाहेर पडू शकले नाहीत. याप्रकरणी कोचिंग सेंटरचा मालक आणि समन्वयक अशा दोघांना अटक करण्यात आली.
११. ४ नोव्हेंबरची पहाट सर्व देशवासियांना सुन्न करणारी होती. सव्वासहाच्या सुमारास उत्तराखंडच्या गढवालहून कुमाऊँ परिसरात जाणारी बस अचानक अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. अलमोरा जवळच्या घाटात घडलेल्या या अपघातात तब्बल ३८ हून जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला तर २५ प्रवासी जखमी झाले. ४२ प्रवाशांची क्षमता असलेल्या या बसमध्ये ६० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
१२. भारतात नोव्हेंबरच्या अखेरीस आलेल्या फेंगलनं दाक्षिणात्य राज्यांची चिंता वाढवली. विशेषतः तामिळनाडूमध्ये या वादळाचा तडाखा सर्वाधिक जाणवला. तिरुवन्नमलाईमध्ये भूस्खलनाची घटना घडली. तर कृष्णगिरीत आलेल्या पुरामध्ये काही वाहनं वाहून गेली. तर पुद्दुचेरीमध्ये गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक पाऊस पडला. तर काही नागरिकांना या पुरामुळे जीवही गमवावा लागला. काही सामाजिक संस्थांच्या अहवालांनुसार २०२४ हे सर्वाधिक संहारक वर्ष ठरतंय. २०२५ मात्र असं ठरू नये, या दुर्घटना, संहारक युद्धांवरील तोडगा घेऊनच २०२५ यावं अशी अपेक्षा करूया. आणि नवीन वर्षाचं स्वागत करूया.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world