MP Crime News : मध्य प्रदेशातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका माजी विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेला पेट्रोल टाकून पेटवून दिले. वैयक्तिक द्वेष आणि एकतर्फी प्रेमातून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परता आणि जलद कारवाईमुळे आरोपीला काही तासांतच अटक करण्यात आली आहे.
नृसिंहपूर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली. येथील उत्कृष्ट विद्यालयातील एका 26 वर्षीय शिक्षिकेवर 18 वर्षांच्या माजी विद्यार्थ्याने हा जीवघेणा हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थ्याचे नाव सूर्यांश कोचर असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे साडेतीन वाजता सूर्यांश पेट्रोलची बाटली घेऊन शिक्षिकेच्या घरी पोहोचला. शिक्षिकेला काहीही कळायच्या आत त्याने तिच्यावर पेट्रोल ओतले आणि आग लावून घटनास्थळावरून पळ काढला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे शिक्षिका गंभीर जखमी झाली आहे.
(नक्की वाचा- VIP प्रोटोकॉलमुळे मृतदेहाची सात तास हेळसांड! छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना)
जखमी अवस्थेत शिक्षिकेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्या शरीराचा १० ते १५ टक्के भाग भाजला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची प्रकृती स्थिर आहे.
हल्ल्याचं कारण काय?
या घटनेमागे नेमके कारण काय याचा तपास पोलिसांनी केला. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी (SDOP) मनोज गुप्ता यांनी सांगितले की, आरोपी सूर्यांश आणि पीडित शिक्षिका दोघेही एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत होते. सूर्यांशला शिक्षिकेबद्दल एकतर्फी आकर्षण होते.
(नक्की वाचा: ठाकरे ब्रँड फेल! बेस्ट निवडणुकीत मनसे-ठाकरे गटाच्या पॅनलचा धुव्वा)
दोन वर्षांपूर्वी सूर्यांशला शाळेतून काढून टाकण्यात आले होते आणि तो दुसऱ्या शाळेत शिकत होता. तरीही त्याने शिक्षिकेचा पाठलाग सुरूच ठेवला होता. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात शिक्षिकेने साडी परिधान केली होती, ज्यावर सूर्यांशने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. शिक्षिकेने त्याची तक्रार शाळेच्या व्यवस्थापनाकडे केली होती, ज्यामुळे तो चिडून गेला होता. याच रागातून त्याने हा हल्ला घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलत आरोपी सूर्यांश कोचरला डोंगरागाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कल्याणपूर गावातून काही तासांतच अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड विधानांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडित शिक्षिकेचा जबाब नोंदवल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.