जाहिरात

VIP प्रोटोकॉलमुळे मृतदेहाची सात तास हेळसांड! छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना

Chhatrapati Sambhajinagar news : सोमवारी सायंकाळी दुचाकीवरून घरी परतत असताना रामेश्वर यांचा माहोरा गावाजवळ भीषण अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने भगवान महावीर चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

VIP प्रोटोकॉलमुळे मृतदेहाची सात तास हेळसांड! छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना

छत्रपती संभाजीनगरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एका दिव्यांग व्यक्तीला अपघाती मृत्यूनंतरही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. शहरात व्हीआयपींच्या बंदोबस्तामुळे पोलिसांनी तब्बल सात तास मृतदेहाचा पंचनामा करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड खुर्द येथील रहिवासी असलेल्या रामेश्वर जगन गाढे या दिव्यांग तरुणाचा सोमवारी रात्री अपघात झाला. तो मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचा हा संघर्षमय प्रवास एका अपघाताने थांबला, पण मृत्यूनंतरही त्याच्या वाट्याला आलेली परवड पाहून सर्वांनीच हळहळ व्यक्त केली.

(नक्की वाचा: ठाकरे ब्रँड फेल! बेस्ट निवडणुकीत मनसे-ठाकरे गटाच्या पॅनलचा धुव्वा)

सोमवारी सायंकाळी दुचाकीवरून घरी परतत असताना रामेश्वर यांचा माहोरा गावाजवळ भीषण अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने भगवान महावीर चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. नियमाप्रमाणे रुग्णालयाच्या प्रशासनाने क्रांती चौक पोलिसांना शवविच्छेदन व पंचनाम्यासाठी माहिती दिली.

पहाटेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत पोलीस पंचनाम्यासाठी पोहोचलेच नाहीत. रामेश्वर यांच्या कुटुंबाने वारंवार पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी त्यांना पोलिसांकडून ‘बंदोबस्तात आहोत, थोड्या वेळाने येतो,' असे उत्तर मिळत होते. हा व्हीआयपी प्रोटोकॉल एवढा महत्त्वाचा होता की, एका मृत तरुणाची आणि त्याच्या दुःखी कुटुंबाची पर्वा केली गेली नाही, असा आरोप रामेश्वर यांच्या नातेवाईकांनी केला.

(नक्की वाचा: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, थेट कानशिलात लगावली)

शेवटी सात तासांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली. एका दिव्यांग तरुणाच्या मृत्यूनंतरही त्याच्या वाट्याला आलेल्या या हालअपेष्टांमुळे समाजात संताप व्यक्त होत आहे. प्रशासकीय कामात व्हीआयपी संस्कृती किती खोलवर रुजली आहे, हेच या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com