नीट परीक्षेच्या गोंधळाप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. नीट (यूजी) 2024 परीक्षा निकालाच्या गोंधळ प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी कोर्टाने फेटळली आहे. एक बाजू ऐकून सीबीआय चौकशी करता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
न्यायमूर्ती विक्रमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी म्हटलं की, आम्ही याचिकेवर विचार केला आहे. आम्ही एका पक्षाची बाजू ऐकून निर्णय देऊ शकत नाही. त्यामुळे केवळ एका पक्षाची बाजू ऐकून सीबीआय चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाही. एका वकिलाने याचिका दाखल करत या प्रकरणी तत्काळ सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
(ट्रेंडिंग बातमी - NEET परीक्षेचा गोंधळ काय आहे? ग्रेस मार्क्स ते पेपर लीक सर्व प्रश्नांची वाचा उत्तरं)
न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी म्हटलं की, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) पेपर लीकच्या आरोपांबाबत सीबीआय/एसआयटी चौकशीच्या मागणीच्या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर देऊ शकते. याशिवाय सुप्रीम कोर्टाने बिहार पोलिसांना संपूर्ण रिपोर्ट सादर करण्याची मागणी करणारी याचिका देखील फेटाळली आहे. आता सुप्रीम कोर्ट नीट परीक्षा गोंधळाबाबच्या विविध याचिकांवर 8 जुलैला सुनावणी घेणार आहे.
( ट्रेंडिंग बातमी : NEET-UG 2024 बाबत मोठा निर्णय, ग्रेस मार्क रद्द; 1563 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा )
सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिलेल्या निकालात म्हटलं की, वाया गेलेल्या वेळेबद्दल 1563 विद्यार्थ्यांना देण्यात आलेले ग्रेस मार्क्स रद्द करण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाने या विद्यार्थ्यांना दोन पर्याय दिले आहेत. एकतर 23 जून रोजी पुन्हा परीक्षा द्यावी. अन्यथा ग्रेस मार्क्सविना गुणांसह मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशाचा पर्याय निवडावा. पुन्हा होणाऱ्या परीक्षेचा निकाल 30 जून रोजी लागणार आहे. संपूर्ण काऊन्सिलिंगची प्रक्रिया थांबवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.