
दहशतवादी तहव्वुर राणाला तब्बल 16 वर्षांनी भारतात आणलं जात आहे . 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात आणले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राणाला 10 एप्रिल रोजी दुपारी दिल्लीला पोहोचेल आणि त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तात्काळ अटक केली जाईल. 2008 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यांनी मुंबई हादरली होती. या हल्ल्यात 166 जणांना जीव गमवावा लागला होता. तहव्वुर ताब्यात आल्याने आता मुंबईवरील हल्ल्याचा कट नेमका कसा रचला गेला याची माहिती मुंबई पोलीस आणि तपास यंत्रणांना मिळणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हल्ल्यापूर्वी राणा भारतात आला होता
राणा 11 नोव्हेंबर 2008 रोजी दिल्लीला आला होता. त्यावेळी सुमारे 11 दिवस भारतात राहिला. दरम्यान तो 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी दोन दिवस पवई येथील एका हॉटेलमध्ये राहिला. दोन दिवसांनी, राणा हल्ल्याच्या एक आठवडा आधी, दुबईला रवाना झाला. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री 10 पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसले. त्यांनी सीएसएमटी, हॉटेल ताजमहाल पॅलेस, ट्रायडंट हॉटेल, नरिमन हाऊस आणि इतर ठिकाणी हल्ला केला. यामध्ये डझनभराहून अधिक परदेशी लोकांसह 166 लोकांचा मृत्यू झाला. प्रत्युत्तरादाखल, 60 तासांच्या कारवाईत, एनएसजी आणि इतर सुरक्षा एजन्सींनी नऊ दहशतवाद्यांना ठार मारले, तर कसाबला पकडण्यात आले.
(नक्की वाचा- 26/11 हल्ल्याच्या मास्टरमाइंडला 17 वर्षांनी भारतात आणणार, तहव्वुर राणाला कुठे ठेवणार?)
हेडलीच्या संपर्कात होता राणा
दरम्यान, ऑक्टोबर 2009 मध्ये डेव्हिड कोलमन हेडलीला अमेरिकेत अटक केली. डेव्हिड हेडली नंतर भारताचा सरकारी साक्षीदार बनला. राणा आणि इतर दहशतवाद्यांविरुद्ध त्याने दिलेल्या साक्षीमुळे या प्रकरणात आणखी खुलासे झाले. 26/11 च्या हल्ल्यापूर्वी डेव्हिड हेडली 5 वेळा भारतात आला होता. या रेकी ट्रिप दरम्यान, तहव्वुरने हेडलीशी 231 वेळा संपर्क साधला. हल्ल्यापूर्वीच्या त्याच्या शेवटच्या प्रवासात राणाने स्वतः सर्वाधिक कॉल केले.
राणा आणि हेडली यांनी इतर दहशतवाद्यांच्या मदतीने ही योजना आखली. त्यांनी हल्ल्यासाठी भारतातील इतर ठिकाणांची मॅपिंक केली. ज्यात दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि इंडिया गेट यांचाही समावेश होता. राणाने हेडली, हाफिज सईद, झकीउर रहमान लखवी, इली काश्मिरी, साजिद मीर आणि मेजर इक्बाल यांच्यासमवेत हल्ल्याचा कट रचला होता, असे एनआयएच्या आरोपपत्रात म्हटले आहे. आता राणाचा ताबा मिळाल्याने आजवर अनुत्तरित असलेल्या अनेक प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world