डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञ परिचारिकांच्या अनुपस्थितीत, केवळ यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून घरातच प्रसूती करण्याचा प्रयत्न तामिळनाडूमधील एका महिलेच्या जीवावर बेतला आहे. के. शशिकला (वय 32 वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रसूतीनंतर झालेल्या अंतर्गत गुंतागुंतीमुळे आणि प्रचंड रक्तस्त्रावामुळे महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
यूट्यूबवरील 'इन्स्ट्रक्शनल व्हिडिओ' पाहून धाडस
'द हिंदू'ने दिलेल्या वृत्तानुसार, शशिकला आणि त्यांचे पती कोलंथसामी (वय 35 वर्ष) यांना आधीच एक 6 वर्षांची मुलगी आहे, जिचा जन्म 2020 मध्ये एका नामांकित रुग्णालयात सुरक्षितपणे झाला होता. मात्र, दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी या दांपत्याने घरातच नैसर्गिक पद्धतीने प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.
24 जून रोजी सकाळी शशिकला यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. यानंतर पती आणि सासू यांनी रुग्णालयात जाण्याऐवजी यूट्यूब सुरू केले. यूट्यूबवर उपलब्ध असलेले प्रसूतीचे 'इन्स्ट्रक्शनल व्हिडिओ' पाहत त्यांनी घरातच शशिकला यांची प्रसूती केली. या प्रयत्नात बाळाचा जन्म सुरक्षितपणे झाला, मात्र त्यानंतर खरी समस्या सुरू झाली.
(नक्की वाचा- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचे पैसे या तारखेला खात्यात जमा होणार, कृषिमंत्र्यांची विधानसभेत घोषणा)
गर्भनाळ अडकली अन् रक्तस्त्राव सुरू झाला
बाळाच्या जन्मानंतर महिलांच्या शरीरातून प्लेसेंटा (गर्भनाळ) नैसर्गिक आणि सुरक्षितपणे बाहेर येणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, घरात केलेल्या या प्रसूतीदरम्यान गर्भनाळ आतच अडकून राहिली. यामुळे शशिकला यांना पोस्ट-पार्टम हेमरेज म्हणजेच प्रसूतीनंतरचा अत्यंत तीव्र रक्तस्त्राव सुरू झाला.
शशिकला यांची प्रकृती झपाट्याने खालावू लागल्याचे पाहून घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने पेरनदुरई येथील शासकीय इरोड वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. तिथून पुढील उपचारासाठी 25 जून रोजी त्यांना कोईम्बतूर येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे रविवारी, 28 जून रोजी उपचारादरम्यान शशिकला यांची प्राणज्योत मालवली.
(नक्की वाचा- Pune Lohagad Case: सियाने लग्नाच्या शॉपिंगसाठी केतनकडून उकळली मोठी रक्कम; एवढ्या पैशांचं काय केलं?)
इंटरनेट किंवा सोशल मीडियावरील व्हिडिओ हे केवळ माहितीसाठी असतात. प्रसूतीदरम्यान अचानक उद्भवणाऱ्या धोक्यांना हाताळण्यासाठी वैद्यकीय शिक्षणाची आणि अनुभवाची गरज असते. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी हलगर्जीपणामुळे झालेल्या मृत्यूची नोंद केली असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world