Tejas Crash Pilot Namansh Syal: दुबई एअरशोमध्ये क्रॅश झालेल्या 'तेजस' (Tejas) लढाऊ विमानाचे वैमानिक (पायलट) नमांश स्याल हे रविवारी पंचतत्वात विलीन झाले. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील पटियालकर गावात त्यांना अश्रूंच्या साक्षीनं शेवटचा निरोप देण्यात आला. यावेळी शहीद पायलट नमांश यांचे वडील, आई, पत्नी, मुलगी तसेच इतर कुटुंबीय आणि नातेवाईक भावूक झाले होते. त्यांना आश्रू रोखणं अनावर झालं होतं. शहीद कुटुंबाच्या या हृदयद्रावक विलापाने उपस्थित वायुसेना अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतर वायुसेनेचे अधिकारीही गहिवरून गेले. वडिलांचे अश्रू, आईचे दुःख, निष्पाप मुलीची आर्त हाक आणि विंग कमांडर असलेल्या पत्नी अफशां यांची वेदना पाहून तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले.
सैन्य सन्मानाने अंतिम संस्कार
विंग कमांडर नमांश स्याल यांचा अंतिम संस्कार आज त्यांच्या मूळ गावी, पटियालकर येथे संपूर्ण सैन्य सन्मानाने करण्यात आला. त्यांचे पार्थिव शरीर दुपारी गग्गल विमानतळावरून त्यांच्या पैतृक गावी आणण्यात आले. गग्गल विमानतळावरून पार्थिव देह रवाना होताच, रस्त्याच्या दुतर्फा लोक त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी उभे होते. विशेष विमानाने पार्थिव शरीर कांगडा येथे पोहोचले. पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचे पार्थिव शरीर रविवारी एका विशेष विमानाने हिमाचलमधील त्यांच्या मूळ गावी पोहोचले. घरी श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांचा सैन्य सन्मानाने अंतिम संस्कार करण्यात आला. तत्पूर्वी, त्यांचे पार्थिव शरीर काही काळ कोईम्बतूरजवळील वायुसेना तळावर ठेवण्यात आले होते.
पत्नी अफशाही विंग कमांडर, सॅल्यूट करताच रडू लागल्या
नमांश यांच्या पत्नी अफशां या स्वतः विंग कमांडर आहेत. त्यांना सैन्यातील नोकरी आणि हौतात्म्य म्हणजे काय, हे चांगलेच माहीत आहे. पण त्याच वेळी, त्या पतीला गमावलेल्या पत्नीही आहेत. ज्यांच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्टपणे दिसत होते. एका बाजूला पतीच्या शौर्याचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला कधीही न भरून येणारी पोकळी, अशा दोन वाटांवर अफशां आज उभ्या होत्या. वडिलांनी दुःख व्यक्त करत सांगितले की, "माझे खूप मोठे नुकसान झाले आहे. मी माझा मुलगा गमावला आहे, तर देशाने एक जवान गमावला आहे." नमांश एक हुशार वैमानिक होते आणि त्यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे, कारण ते देशातील चार एरोबॅटिक वैमानिकांपैकी (Aerobatic Pilot) एक होते.
आता बाबा कधीच परत येणार नाहीत...
त्यांची 7 वर्षांची निरागस मुलगी आहे. तिला कदाचित अजून पूर्णपणे हेही माहीत नसेल की तिचे बाबा आता तिला कधीच मिठीत घेण्यासाठी परत येणार नाहीत. नमांश यांचे वडील गगन कुमार हे स्वतः शिक्षक आहेत. ते म्हणाले की, "हे दुःख केवळ त्यांच्या कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण देशाचे आहे." गावातही सन्नाटा पसरला होता. नमांश स्याल यांच्या निधनाने त्यांच्या गावातच नव्हे, तर संपूर्ण हिमाचल प्रदेशात शोकाची लाट पसरली आहे. शहीद नमांश यांना अंतिम निरोप देण्यासाठी त्यांच्या गावी मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते. सगळ्यांनीच अश्रूपूर्ण नयनांनी त्यांना निरोप दिला. त्यांच्या चुलत भावाने निशांतने त्यांना मुखाग्नी दिली.
दुबई एअरशोमध्ये तेजस क्रॅश कसा झाला?
दुबई एअरशोमध्ये शुक्रवारी भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमान तेजस (LCA Tejas) सोबत हा मोठा अपघात झाला. फ्लाइंग डिस्प्ले दरम्यान विमानाने अचानक नियंत्रण गमावले आणि ते खाली कोसळून दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात तेजसच्या वैमानिकाला गंभीर आणि प्राणघातक दुखापती झाल्या, ज्यामुळे त्यांना वीरमरण आले. या घटनेवर भारतीय बाजूनेही तीव्र शोक व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय वायुसेनेने या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, वैमानिकाच्या निधनाने झालेल्या या अपूर्णीय नुकसानीबद्दल खेद व्यक्त केला आहे. भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान तसेच भारतीय सशस्त्र दलाच्या सर्व पदांच्या अधिकाऱ्यांनी निवेदन जारी करून वैमानिकाच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
#WATCH | हिमाचल प्रदेश: विंग कमांडर अफशां ने अपने पति, विंग कमांडर नमांश स्याल को अंतिम श्रद्धांजलि दी।
— ANI_HindiNews (@AHindinews) November 23, 2025
विंग कमांडर नमांश स्याल 21 नवंबर को दुबई में LCA तेजस क्रैश में शहीद हो गए। pic.twitter.com/iqGlM4XAi9
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world