- अहमदाबाद-मुंबई सेंट्रल तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला मिळालेल्या बिर्याणीत माशी सापडल्याने तक्रार
- आयआरसीटीसीने केटरिंग कंपनी आराहा हॉस्पिटॅलिटीविरोधात 1 लाख रुपयांचा दंड ठोठावून कारण दाखवा नोटीस बजावली आहे
- रेल्वे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात
Tejas Express Biryani Controversy: ट्रेनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत अनेकदा तक्रारी समोर येत असतात. यावेळेस तेजस एक्स्प्रेस निकृष्ट दर्जाच्या जेवणाच्या वादात सापडली आहे. तेजस एक्स्प्रेसमधील बिर्याणीत माशी सापडली होती. या प्रकरणी रेल्वेने मोठी कारवाई केली आहे. व्हेज बिर्याणीमध्ये माशी सापडल्याची तक्रार अहमदाबाद-मुंबई सेंट्रल तेजस एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 82902) मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने केली होती. आयआरसीटीसी (IRCTC) च्या अधिकाऱ्यांनुसार, तेजस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या या व्यक्तीने जेवणासाठी कॉम्बो लंचचा पर्याय निवडला होता.
जेवणात माशी सापडल्याने कंत्राटदाराला दंड
तक्रार मिळताच ट्रेन कॅप्टन आणि ऑनबोर्ड केटरिंग मॅनेजरने प्रवाशाची भेट घेऊन त्याला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. प्रवाशाला त्वरित दुसरे जेवण देण्याची तयारी दर्शवण्यात आली, पण त्याने ते घेण्यास नकार दिला. हे प्रकरण गांभीर्याने घेत आयआरसीटीसीने संबंधित केटरिंग फर्म 'आराहा हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड'च्या कंत्राटदाराला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच कंत्राटदाराचा परवाना (लायसन्स) का रद्द करण्यात येऊ नये, अशी विचारणा करत 'कारण दाखवा नोटीस' बजावली आहे.
IRCTC ने केटरिंग कंपनीला दिले कडक निर्देश
रेल्वेने विक्रेत्याला निर्देश दिले आहेत की, फक्त ताज्या आणि पुरेशी शेल्फ लाइफ (टिकण्याची क्षमता) असलेल्या कच्च्या मालाचाच वापर करावा. जेवण तयार करण्यापूर्वी सर्व साहित्याच्या दर्जाची तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यासोबतच तांदूळ, डाळ, पीठ आणि मसाले यासारखे खाद्यपदार्थ ठेवणाऱ्या कंटेनर्सची नियमित तपासणी आणि ते हवाबंद स्थितीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना दर्जेदार आणि सुरक्षित जेवण देणे ही आपली प्राथमिकता असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. तसेच अशा निष्काळजीपणावर कडक कारवाई सुरूच राहील.
(नक्की वाचा: Mumbai-Bengaluru Vande Bharat चा फर्स्ट लुक, VIDEO पाहून रेल्वे की फाईव्ह स्टार हॉटेल!)
IRCTC एआय कॅमेऱ्यांद्वारे करतेय किचनची देखरेखया घटनेने पुन्हा एकदा ट्रेनमधील जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की, रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा आधीपेक्षा अधिक सुधारण्यासाठी आयआरसीटीसी 'एआय' (AI) कॅमेऱ्यांद्वारे किचनवर कडक नजर ठेवत आहे. ही देखरेख व्यवस्था आधीपेक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे. यासाठी बेस किचनमध्ये एआय आधारित मॉनिटरिंग सिस्टम लागू करण्यात आली आहे. याद्वारे देशभरातील किचनमध्ये जेवण बनवण्याच्या प्रक्रियेवर 24 तास नजर ठेवली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world