छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांना नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या धडक कारवाईत नक्षलवाद्यांचा टॉप कमांडर पापा राव याला कंठस्नान घातले आहे. हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या फळीत पापा राव हा सर्वात प्रभावशाली मानला जात होता, त्यामुळे त्याचा खात्मा होणे हा सुरक्षा दलांसाठी एक मोठा विजय मानला जात आहे.
नक्की वाचा: BMC Election 2026 Result: महापालिका निकालावर कंगना रणौतची सणसणीत प्रतिक्रिया
सर्च ऑपरेशन अजून सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, बीजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात नक्षलवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. शोधमोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पापा रावसह अन्य एक नक्षलवादी ठार झाला. घटनास्थळावरून जवानांनी दोन एके-47 (AK-47) रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे. बीजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी या चकमकीला दुजोरा दिला असून अद्याप परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे सांगितले.
कोण होता पापा राव?
पापा राव हा नक्षलवाद्यांच्या 'भैरमगड वेस्ट बस्तर एरिया कमिटी'चा प्रमुख सदस्य होता. बस्तर, बीजापूर आणि सुकमा या भागात तो अत्यंत सक्रिय होता. पापा राववर 40 हून अधिक गंभीर गुन्हे आणि हत्येचे गुन्हे दाखल होते. पापा राव याच्यावर नक्षलवादी संघटनेत शस्त्रपुरवठा, नवीन तरुणांची भरती आणि पीएलजीए (PLGA) ची रसद व्यवस्था सांभाळण्याची मुख्य जबाबदारी होती.
नक्की वाचा: कैद्यांच्या मजुरीत घसघशीत वाढ! आशा सेविकांपेक्षा घेणार जास्त पगार; सरकारच्या निर्णयाने मोठा वादंग
पत्नीपाठोपाठ पापालाही पाठवले यमसदनी
काही महिन्यांपूर्वी सुरक्षा दलांनी कांदुलनारच्या जंगलात एक मोठी मोहीम राबवली होती. त्या चकमकीत पापा रावची पत्नी उर्मिला (एरिया कमिटी सचिव) मारली गेली होती. त्यावेळी पापा राव जंगलाचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र, आज जवानांनी त्याला घेरून त्याचा खात्मा केला. हिडमा आणि आता पापा राव यांसारख्या मोठ्या नेत्यांच्या मृत्यूमुळे बस्तरमधील नक्षलवादी चळवळीला खिंडार पडले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world