UP Crime News: उत्तर प्रदेशातील झाँसी जिल्ह्यात 12 वर्षांच्या मुलाच्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बबीना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुरा गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. साहिल यादव असं मृत मुलाचं नाव आहे. साहिल रविवार संध्याकाळपासून बेपत्ता होता.
कुटुंबियांनी साहिलची शोधाशोध सुरू केली होती. सोमवारी, कुटुंबातील सदस्य शेतातील एका खोलीत शोध घेत असताना, त्यांना भूसा ठेवलेल्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद दिसला. त्यांनी दरवाजा उघडल्यावर आतमध्ये साहिलचा मृतदेह भूसाखाली रक्ताच्या थारोळ्यात आढळला.
साहिलची हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आली होती. त्याचा गळा धारदार शस्त्राने चिरलेला होता आणि प्रायव्हेट पार्टही कापला होता. मृतदेह भूसाखाली लपवून ठेवण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
(नक्की वाचा- Satara Doctor Case: दोघांशी ही संबंध, लॉजचा रुमही स्वत:बुक केला, चौकशीत धक्कादायक खुलासे)
साहिलच्या पालकांनी या निर्घृण हत्येसाठी मुलाचे काका अवतार आणि काकी मंजू यांच्यावर थेट आरोप केला आहे. कौटुंबिक वाद हे यामागील कारण असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी तातडीने साहिलच्या काका आणि काकीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
घटनेची माहिती मिळताच, पोलीस पथकासह फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्यांनी खोलीची कसून तपासणी केली. पोलीस सध्या या हत्येमागील हेतू शोधत असून, आरोपींचा कसून तपास सुरू आहे. कौटुंबिक वादातून एवढ्या क्रूरपणे हत्या केल्याच्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.