साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या आत्महत्या प्रकरणाची वेगाने चौकशी सुरू आहे. याबाबत साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणी जी माहिती दिली ती धक्कादायक आहे. या प्रकरणाच्या चौकशीत आतापर्यंत काय काय समोर आले आहे याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. यामध्ये त्यांनी सदर प्रकरणाचा तपास कुठवर आला आहे हे सांगितले. यावरून या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही असे सांगण्यात आले आहे.
(नक्की वाचा: Satara Doctor Death Case: लक्ष्मी पूजनाला महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं? रुपाली चाकणकरांनी दिली ही माहिती)
सातारा डॉक्टर मृत्यू प्रकरण, दोन आरोपी अटकेत
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की सुसाईड नोटच्या आधारावर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोनही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. सुरुवातीला डिजिटल पुरावे तपासण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितलं. सदर प्रकरणी फॉरेन्सिक अहवालही मिळाला आहेत. शिवाय आरोपी आणि पीडित डॉक्टर तरूणी यांचे मोबाईलही चेक केले गेले आहेत. त्यावरून आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचे दोन्ही आरोपींसोबत संबंध होते ही बाब समोर आल्याचे दोशी यांनी यावेळी सांगितले.
लॉजमध्ये नेमकं काय झालं ? प्रकरणाचं गूढ वाढलं
पोलीस अधीक्षक दोशी यांनी सांगितले की पीडिता ही दोन्ही आरोपींच्या नियमित संपर्कात होती. पीडिता आणि आरोपींमध्ये झालेले काही चॅट आपल्याला सापडले असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. प्रथमदर्शनी दोन्ही आरोपींसोबत तिचे संबंध होते हे स्पष्ट होत असल्याचं त्यांनी सांगितलं. ती एका भाड्याच्या खोलीत राहात होती. असं असताना ही ती लॉजवर गेली होती असा प्रश्न निर्माण झाला आहे. या लॉजची रूमही तिनेच बुक केली असल्याचेही पोलिसांना दिसून आले आहे. तिने असं नेमकं का केलं ? याचा पोलीस तपास करत आहेत. पीडिता लॉजवर कशासाठी गेली होती? तिथे तिला कुणी भेटलं होतं का? या प्रश्नांची उत्तर आम्ही शोधत आहोत असं पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा- Satara News: "माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला..." पोलीस अधिकाऱ्यावर आरोप करत डॉक्टर तरुणीची आत्महत्या
गुंता सोडवण्याचा पोलिसांचा प्रयत्न
साताऱ्यातील डॉक्टर ज्यावेळी लॉजवर गेली त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध झाले आहे. त्यात कुठल्याही प्रकारची संशयास्पद हालचाल दिसत नसल्याचं ही यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. तिने रात्री दीडच्या सुमारास आत्महत्या केली आहे. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवालही प्राप्त झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्या दृष्टीने आता पुढील तपास सुरू आहे. पीडितेचे दोनही आरोपींसोबत असलेले संबंध, त्यांच्याशी चॅटींगद्वारे झालेला संवाद आणि पीडितेचं लॉजवर जाणं या सगळ्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढला असून पोलीस तो सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
