उत्तरप्रदेश: आंघोळ करताना गिझर फुटल्याने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. उत्तर प्रदेशातील बरेली येथे ही मन सुन्न करणारी घटना घडली. तरुणीचे पाच दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. अवघ्या पाच दिवसात सुखी संसार उध्वस्त झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बरेलीच्या भोजीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात गिझरचा स्फोट झाल्याने एका नवविवाहित महिलेचा मृत्यू झाला. बराच वेळ बाथरुममध्ये आवाज येत नसल्याने घरातील लोकांनी दरवाजा तोडून तिला बाहेर काढले परंतु काही वेळाने मृत्यू झाला. 22 नोव्हेंबरला तरुणीचा विवाह झाला होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
नक्की वाचा: मुख्यमंत्री शपथविधीची तारीख, ठिकाण, मुहूर्त ठरला? विलंबाचं कारणही आले समोर
भोजीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील पिपलसाना चौधरी गावात राहणारे दीपक यादव यांचा विवाह बुलंदशहरजवळील गावात रहिवासी सूरजपाल यांची मुलगी दामिनीसोबत २२ नोव्हेंबर रोजी झाला होता. दामिनी 23 नोव्हेंबर रोजी निघून पीपल सना चौधरी येथील तिच्या सासरच्या घरी आली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ती आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती. बराच वेळ आंघोळ करूनही ती बाहेर न आल्याने पती दीपकने हाक मारली, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ कोणताही प्रतिसाद न आल्याने कुटुंबीय चिंतेत होते.
शेवटी कुटुंबीयांनी पुन्हा बाथरूमच्या गेटचा दरवाजा तोडला असता, नवविवाहित महिला बेशुद्ध अवस्थेत पडली होती. कुटुंबीयांनी तिला तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी पाहताच मृत घोषित केले. मेडिकल कॉलेजकडून मिळालेल्या माहितीवरून भोजीपुरा पोलिस स्टेशनचे एसआय देवेंद्र सिंह घटनास्थळी पोहोचले आणि कुटुंबीयांची चौकशी केली.
सासरच्या मंडळींच्या माहितीवरून मृताचे आई-वडीलही आले. विवाहितेच्या मृत्यूने कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. भोजीपुरा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रवीण सोळंकी यांनी सांगितले की, बाथरूममध्ये आंघोळ करताना गिझरचा स्फोट झाला, त्यामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
महत्वाची बातमी: 'EVM मध्ये घोटाळा, त्यामुळे महायुतीचा विजय' युतीतल्या माजी नेत्याचा खळबळजनक दावा