उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील एका गावात आनंदाचे वातावरण असलेल्या लग्नमंडपात शुक्रवारी रात्री अचानक खळबळ उडाली. गाणी, विधी आणि मेजवानीने रंगलेल्या या सोहळ्याचा शेवट अत्यंत धक्कादायक झाला. 22 वर्षीय नवरदेव हा तृतीयपंथी समुदायाशी संबंधित असल्याचे उघड झाल्याने नवरीच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले.
लग्नाची धामधूम आणि तो खुलासा
सहा महिन्यांपूर्वी बाराबंकीमधील एका स्थानिक मुलीचे लग्न प्युरे गणाई गावातील ऋषू नावाच्या तरुणाशी ठरले होते. 13 फेब्रुवारी रोजी वाजत-गाजत वऱ्हाड आले, जेवण झाले आणि पहाटे 4 च्या सुमारास लग्नाचे सात फेरेही पूर्ण झाले. पाठवणीची तयारी सुरू असताना, स्थानिक 'कडोपूर' भागातील तृतीयपंथीयांचा एक गट परंपरेनुसार 'नेग' मागण्यासाठी तिथे पोहोचला. नवरदेवाला पाहताच त्या तृतीयपंथीयांनी त्याला ओळखले. त्यांनी दावा केला की, हा नवरदेव पूर्वी त्यांच्याच टोळीचा भाग होता.
(नक्की वाचा- Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)
लपवाछपवी आणि गोंधळ
तृतीयपंथीयांनी ओळख पटवताच नवरदेवाच्या कुटुंबीयांनी त्यांना शांत राहण्यासाठी तातडीने 23 हजार रुपये दिले. मात्र, नवरीच्या नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी नवरदेवाला चौकशीसाठी आत बोलावले. नवरदेवाने आत जाण्यास नकार दिला आणि तिथेच मोठा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अखेर पाहुण्यांनी नवरदेवाला पकडून ठेवले आणि पोलिसांना पाचारण केले.
खर्च परत करण्याचा करार
सामाजिक संवेदनशीलतेमुळे याप्रकरणी कोणतीही अधिकृत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली नाही. मात्र, दोन्ही बाजूंच्या चर्चेनंतर नवरदेवाच्या कुटुंबीयांनी लग्नाचा सर्व खर्च परत करण्याचे मान्य केले.
(नक्की वाचा- Crime News: मैत्रिणीची हत्या अन् मृतदेहावर अत्याचार; 'आत्मा' बोलावण्यासाठी अघोरी कृत्य, भयंकर घटनाक्रम)
सर्व विधी पूर्ण होऊनही नवरीने अशा परिस्थितीत सासरी जाण्यास स्पष्ट नकार दिला. परिणामी, ज्या उत्साहात वऱ्हाड आले होते, त्याच वऱ्हाडाला नवरीविना रिकाम्या हाताने परतावे लागले. या घटनेची सध्या संपूर्ण परिसरात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.