PM Modi Likely To Visit White House In February: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी दीर्घ चर्चा झाली. ट्रम्प यांनी मोदी यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला. या गप्पांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या संभाव्य अमेरिका दौऱ्याची रूपरेषाही ठरली.
ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, पंतप्रधान मोदी हे फेब्रुवारीमध्ये अमेरिका दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. फ्लोरिडाला परतत असताना ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, माझं सोमवारी सकाळी पंतप्रधान मोदी यांच्याशी विस्ताराने बोलणे झाले. ते पुढच्या महिन्यात व्हाईट हाऊसला भेट देणार आहेत. कदाचित फेब्रुवारीमध्ये ते दौरा करतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध उत्तम आहेत, त्यामुळे ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून साधलेल्या संवादावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला. दोघांमध्ये काय संवाद झाला याची उत्सुकता होती. ट्रम्प यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, आमच्या दोघांमधील बोलण्यात बरेच विषय चर्चेला आले.
(नक्की वाचा- 'खऱ्या भारताची गोष्ट' कुंभमेळ्यापासून जगानं काय शिकलं पाहिजे? Gautam Adani यांनी समजावून सांगितलं)
ट्रम्प हे यापूर्वी राष्ट्राध्यक्ष असताना त्यांचा शेवटचा परदेशातील दौरा हा भारताचा दौरा होता. ट्रम्प आणि मोदी यांचे संबंध हे सातत्याने उत्तम राहिलेले आहेत. या दोघांनी 2019 मध्ये अमेरिकेतली हूस्टन आणि 2020 साली भारतातील अहमदाबादमध्ये एकत्रितपणे जाहीर सभाही घेतल्या आहेत.
या संभाषणापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अभिनंदन केले होते. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, आम्ही परस्परांना लाभदायक आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या जनतेच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी एकत्रित काम करू.
पंतप्रधानांनी ‘एक्स' वर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष @realDonaldTrump @POTUS यांच्याशी संवाद साधताना आनंद वाटला. त्यांच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांचे अभिनंदन केले. आम्ही परस्परपूरक आणि विश्वासार्ह सहकार्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या जनतेच्या कल्याणासाठी तसेच जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी एकत्रित काम करू.”
(नक्की वाचा- Uniform Civil Code 'या' राज्यात लागू झाला समान नागरी कायदा, लग्न ते घटस्फोटापर्यंत काय होणार बदल?)
व्हाईट हाऊसने काय सांगितलं?
व्हाईट हाऊसने म्हटले की, दोन्ही नेत्यांनी अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी आणि इंडो-पॅसिफिक क्वाड भागीदारी पुढे नेण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हाईट हाऊस भेटीच्या योजनांवरही चर्चा झाली. तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडून अमेरिका निर्मित सुरक्षा उपकरणांची खरेदी वाढवणे आणि द्विपक्षीय व्यापार संबंध वाढवण्यावर भर दिला.