जाहिरात

Vande Bharat Train: 'वंदे भारत'मधील जेवणामुळे महिलेसोबत भयंकर घडलं, 2 वर्षांच्या चिमुरड्याला डायरिया

वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणामुळे प्रकृती बिघडल्याचा दावा रांची येथील एका महिला प्रवाशाने केला आहे. प्रवासादरम्यान देण्यात आलेल्या निकृष्ट जेवणामुळे स्वतःला गंभीर ॲलर्जी आणि दोन वर्षांच्या मुलाला अतिसार (डायरिया) झाल्याचे तिने सोशल मीडियावर म्हटले आहे.

Vande Bharat Train: 'वंदे भारत'मधील जेवणामुळे महिलेसोबत भयंकर घडलं, 2 वर्षांच्या चिमुरड्याला डायरिया

स्पीड आणि अत्याधुनिक सुविधांसाठी ओळखल्या जाणाऱ्या 'वंदे भारत एक्सप्रेस'मधील जेवणाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रांची येथील रहिवासी आयुषी सिंह यांनी रेल्वेमधील जेवण खाल्ल्यानंतर स्वतःची आणि आपल्या लहान मुलाची प्रकृती खालावल्याचा गंभीर आरोप केला असून, सोशल मीडियावर याचे फोटो शेअर केले आहेत.

काय आहे हे प्रकरण?

आयुषी सिंह 27 मार्च रोजी वाराणसी-देवघर वंदे भारत एक्सप्रेसच्या E1 कोचमधून प्रवास करत होत्या. त्यांच्या दाव्यानुसार, जेवण खाल्ल्यानंतर त्यांना तीव्र 'लाईफ थ्रेटनिंग' ॲलर्जी झाली, तर त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाला डायरियाची लागण झाली.

रेल्वेमध्ये पुरवण्यात आलेले अन्न अत्यंत खराब दर्जाचे होते आणि पिण्याच्या पाण्याची चवही संशयास्पद होती. तक्रार करूनही रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही, असा आरोप आयुषी यांनी 'X' (ट्विटर) वर केला आहे.

मेडिकल रिपोर्ट आणि पुरावे

आयुषी यांनी रांची येथील एका रुग्णालयाचा मेडिकल रिपोर्टही सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्यांना झालेल्या इन्फेक्शनचा उल्लेख असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये, अशी आर्त हाक त्यांनी रेल्वे मंत्र्यांना टॅग करून दिली आहे.

IRCTC चे स्पष्टीकरण

या तक्रारीनंतर आयआरसीटीसीने (IRCTC) त्वरित आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 27  मार्च रोजी संबंधित ट्रेनमध्ये पुरवण्यात आलेल्या अन्नाची तपासणी केली असता ते समाधानकारक आढळले. त्या दिवशी त्याच डब्यातील किंवा ट्रेनमधील इतर कोणत्याही प्रवाशाने अन्नाबाबत तक्रार केलेली नाही. रेल्वेने आपले अन्न सुरक्षा मानांकन योग्य असल्याचे सांगत आयुषी यांचे दावे फेटाळले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com