Vande Bharat Express News: देशातील सर्वात प्रगत आणि हायस्पीड मानल्या जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्स्प्रेसमधून प्रवास करताना तुम्हाला राजेशाही थाटात जेवण मिळेल अशी अपेक्षा असते. मात्र, याच हायप्रोफाईल ट्रेनमध्ये प्रवाशांना देण्यात आलेल्या जेवणात चक्क जिवंत किडे आढळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर रेल्वे मंत्रालयाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तब्बल 60 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कुठे घडला हा प्रकार?
हा संपूर्ण प्रकार पटना ते टाटानगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये (ट्रेन क्रमांक 21896) घडला आहे. प्रवाशांना रात्रीच्या जेवणासोबत एका प्रसिद्ध ब्रँडचे पॅकेटबंद दही देण्यात आले होते. प्रवाशांनी हे पाकीट उघडले, तेव्हा त्यात जिवंत किडे वळवळताना दिसले. एका प्रवाशाने तातडीने याचा व्हिडिओ बनवून रेल्वे मंत्री आणि आयआरसीटीसीला टॅग करत सोशल मीडियावर पोस्ट केला. या तक्रारीनंतर रेल्वे मंत्रालयाने तातडीने सूत्रे हलवली.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीतील प्रसिद्ध शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाकडून शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी;शहरात संताप )
रेल्वे मंत्रालयाची मोठी कारवाई
सुरुवातीला आयआरसीटीसीने संबंधित कंत्राटदार 'कृष्णा एंटरप्रायजेस'वर केवळ 25,000 रुपयांचा दंड आकारला होता. मात्र, रेल्वे मंत्रालयाने या सौम्य कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्रालयाने कडक पाऊल उचलत हा दंड 25,000 रुपयांवरून थेट 50 लाख रुपये करण्याचा आदेश दिला. एवढेच नाही तर, संबंधित कंत्राटदाराचे कंत्राटही तातडीने रद्द करण्यात आले आहे.
या प्रकरणात केवळ कंत्राटदारावरच नव्हे, तर देखरेख ठेवण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळावरही (IRCTC) कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसीवर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एकूण 60 लाख रुपयांच्या या दंडामुळे रेल्वेच्या खानपान क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि अन्नाचा दर्जा हीच आमची प्राथमिकता असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
या घटनेनंतर रेल्वेने सर्व सुपरवायझर्सना अन्नाचा दर्जा आणि स्वच्छतेबाबत कडक सूचना दिल्या आहेत. पॅकेटबंद अन्नपदार्थांची निर्मिती तारीख आणि एक्सपायरी डेट तपासूनच ते प्रवाशांना दिले जावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा आढळल्यास आणखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world