रेल्वेतून आरामदायी वेगवान प्रवास करता यावा यासाठी गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. तेजस, वंदे भारत ट्रेन सेवेत दाखल करणे हा या प्रयत्नांमधील एक मोठा आणि ऐतिहासिक भाग होता. भारतीय रेल्वे आता एक पाऊल पुढे जात स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेन (Vande Bharat Sleeper Train) आतून कशी दिसते याचे फोटो आणि व्हिडीओ बघायला मिळाले आहेत. यावरून ही ट्रेन अत्यंत आरामदायी, स्वच्छ आणि वेगवान असणार हे स्पष्ट होतंय. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार होऊन सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. दुसरी वंदे भारत ट्रेन तयार होऊन रूळावर उतरताच वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रवासाला सुरूवात होईल.
नक्की वाचा: महिला प्रवाशाचा मृत्यू, 'उबर'चे संचालक मोठ्या अडचणीत
वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार ? (Vande Bharat Sleeper Train Route)
काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत दाखल होईल असे आश्वासन दिले होते. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील वंदे भारत स्लीपर ट्रेन ही राजधानी एक्सप्रेसपेक्षा आरामदायी, वेगवान आणि अत्याधुनिक असणार आहे. या ट्रेनची सेवा सुरू करण्यासाठी 2 गाड्यांची आवश्यकता असून त्यापैकी एक गाडी तयार झाली आहे. ही ट्रेन स्लीपर असल्याने ती लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरली जाणार हे निश्चित आहे. अशात या ट्रेनचा मार्ग कोणता असेल याबाबतही मोठी उत्सुकता आहे. लांबचा पल्ला आणि अधिक प्रवासी असलेला मार्ग या ट्रेनसाठी निवडणं गरजेचं आहे. सध्या भारतामध्ये मुंबई दिल्ली ( New Delhi-Mumbai Routes) आणि दिल्ली-कोलकाता हे सगळ्यात जास्त लांबीचे आणि सर्वाधिक प्रवासी असलेले मार्ग आहेत. त्यामुळे या दोन मार्गांपैकी एकावर वंदे भारत स्लीपर ट्रेन धावेल अशी शक्यता आहे. या दोन्ही मार्गांवरील राजधानी एक्सप्रेसला सर्वाधिक प्रतिसाद मिळताना दिसतो.
नक्की वाचा: ठाणे-बोरिवली 23 किमीचा प्रवास आता फक्त 15 मिनिटांत; दुहेरी बोगदा प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण
वंदे भारत स्लीपर ट्रेनची खासियत काय आहे ?
कायनेट रेल्वे सोल्युशन्सने वंदे भारत स्लीपर ट्रेनची निर्मिती केली आहे. भारत आणि रशियाने एकत्र येत ही कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी 120 वंदे भारत स्लीपर ट्रेनची निर्मिती करणार आहे. या गाडीची चाचणी घेत असताना तिने ताशी 180 किलोमीटर प्रतितास वेगाचा टप्पा गाठला होता. या गाडीमध्ये वायफाय सुविधा मिळेल, चार्जिंग पॉईंट मिळतील आणि लांब पल्ल्याचा प्रवास लक्षात घेता अत्यंत आरामदायी सुविधा मिळतील.