मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) माध्यमातून साकारत असलेला भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग, म्हणजेच ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आज एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) रस्ते प्रवासात मोठी क्रांती घडवणारा ठरणार आहे.
सर्वात मोठा टीबीएम खाली उतरवला
एमएमआरडीएने (MMRDA) ठाणे बाजूच्या पोर्टलचे उत्खनन यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, आता 13.34 मीटर व्यासाचा सिंगल-शिल्ड टनल बोरिंग मशीनचा कटरहेड खाली उतरवण्यात आला आहे. भारतातील कोणत्याही शहरी पायाभूत प्रकल्पात वापरलेला हा सर्वात मोठा टीबीएम आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे हा क्रांतिकारी प्रकल्प प्रत्यक्ष बोगदा खोदकाम टप्प्यासाठी सज्ज झाला आहे.
(नक्की वाचा- दक्षिण मुंबई ते ठाणे प्रवास फक्त 25 मिनिटांत; MMRDA चा नवा प्रकल्प ईस्टर्न फ्रीवेवरील वाहतूक कोंडी फोडणार)
प्रवासाच्या वेळेत मोठी बचत
हा 11.8 किलोमीटर लांबीचा भूमिगत ट्विन टनल ठाण्यातील घोडबंदर रोडला बोरीवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेशी थेट जोडेल. सध्या ठाणे ते बोरिवली हा 23 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी 60 ते 90 मिनिटे लागतात. बोगदा प्रकल्प पूर्ण झाल्यावर हाच प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांना थेट व जलद दळणवळणाची सोय मिळून त्यांच्या वेळेची मोठी बचत होईल. तसेच, घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि संपूर्ण परिसरातील वायू व ध्वनी प्रदूषणात लक्षणीय घट होईल.
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि सुरक्षा
हा बोगदा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. त्यामुळे या कामासाठी अत्याधुनिक टीबीएम तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानामुळे अत्यंत सुरक्षित, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बांधकाम कमीतकमी जमिनीच्या कंपनांसह शक्य होणार आहे.
(नक्की वाचा- Cute VIDEO: मुलीने दाखवली 'कोरियन हार्ट' साईन; वडिलांच्या रिअॅक्शनने जग जिंकलं, व्हिडीओ व्हायरल)
बोगद्याची वैशिष्ट्ये
हा प्रकल्प दोन समांतर टनलचा आहे. प्रत्येक टनलमध्ये दोन लेन आणि एक आपत्कालीन लेन असतील. तसेच दर 300 मीटरवर क्रॉस-पॅसेजेस असतील.
आधुनिक प्रणाली बोगद्यात हवा खेळती रहावी यासाठी आधुनिक व्हेन्टिलेशन सिस्टम, अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा, धूर संवेदक आणि एलईडी साईनबोर्ड्स बसवले जातील. टीबीएम कटरहेड यशस्वीरित्या खाली उतरवणे हे केवळ अभियंत्रिकी कौशल्याचे उदाहरण नसून, मुंबई आता क्लिष्ट भूमिगत मोबिलिटी प्रकल्पांना समर्थपणे पूर्ण करण्यास तयार आहे, याचा पुरावा आहे. एमएमआरडीए ठाणे-बोरिवली ट्विन टनलसारख्या प्रकल्पांद्वारे मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय लिहीत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world