- मुंबईच्या मुलुंड भागात झालेल्या अपघातात उबर बाईकवरील महिला प्रवासी शुभांगी सुरेंद्र मगरे यांचा मृत्यू झाला
- नवघर पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तक्रारीनुसार उबर कंपनीच्या संचालकांवर गुन्हा नोंदवला आहे
- उबर कंपनीने बेकायदेशीरपणे रजिस्टर केलेली मोटारसायकल वापरल्याचा आरोप
ॲप-आधारित टॅक्सी सेवा पुरवणारी कंपनी Uber India कंपनीच्या संचालकांविरोधात मुलुंडच्या नवघर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तात्पुरती परवानगी असूनही, खासगी बाईक व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्याचा आरोप आरटीओने केला आहे. यापैकी एका बाईकला झालेल्या अपघातामध्ये शुभांगी सुरेंद्र मगरे नावाच्या 49 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी RTO ने Uber च्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) मुंबई पूर्व, वडाळा येथील मोटार वाहन निरीक्षक रवींद्र गावडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, कंपनीने मोटार वाहन कायद्याचे पद्धतशीरपणे उल्लंघन केल्याचे दिसून आल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.
( नक्की वाचा : OLA Uber: ओला-उबरचे भाडे आता सरकारच्या हातात? 'ॲग्रीगेटर नियम 2025' मुळे काय बदलणार? वाचा सर्व माहिती )
प्रवासी महिलेचा मृत्यू, बाईक टॅक्सी चालक गंभीर जखमी
29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजताच्या सुमारास मुलुंड पूर्वेकडील पूर्व द्रुतगती महामार्गावरील ऐरोली फ्लायओव्हर पुलाखाली एक अपघात झाला होता. भरधाव वेगाने आलेल्या एका मिक्सर ट्रकने (क्रमांक MH 43 BG 6282) बाईकला उडवलं होतं. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला होता तर बाईकचालक गणेश विश्राम माधव गंभीर जखमी झाला होता. ही बाईक उबरसोबत बाईक टॅक्सी म्हणून नोंदणी करण्यात आलेली होती.
( नक्की वाचा : Pune News : पुणेकर पुन्हा खोळंबणार! 'या' कारणामुळे सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल 66 ठिकाणी तोडणार, 118 कोटी... )
RTO ने उबरच्या विरोधात तक्रार का केली ?
उबर कंपनीला ॲप-आधारित वाहतुकीसाठी तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. तात्पुरती परवानगी असतानाही उबरने नियमबाह्य पद्धतीने बाईक टॅक्सी सेवा सुरू केल्याचा आरोप केला जात आहे. आरटीओच्या तपासणीत उघड झाले की, उबर चालकाने त्यांच्या मामांच्या नावे असलेली खासगी ॲक्टिव्हा स्कूटर (MH 47 U 4836) परिवहन विभागाची कोणतीही परवानगी न घेता कंपनीच्या ॲपवर बेकायदेशीरपणे रजिस्टर केली होती. मोटार वाहन कायद्याचे कलम 66 खासगी वाहनांना व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यास मनाई करते. कंपनी या तरतुदींचा भंग करून प्रवाशांच्या जीवांशी खेळ करत आहे आणि शासनाची तसेच प्रवाशांची फसवणूक करत आहे असा आरोप RTO ने केला आहे. याशिवाय, उबर कंपनी त्यांच्या चालकांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (character verification) किंवा कोणतीही सुरक्षा तपासणी करत नाही, जे महिला प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world