Navi Mumbai Crime : 'WhatsApp विद्यापीठा'चा ज्येष्ठाला फटका, ती बाब सत्य मानली अन् दीड कोटी गेले वाया

सध्या व्हॉट्सअॅपवर आलेल्या सर्व गोष्टींना खरं मानलं जातं. त्याची शहानिशा न करता विश्वास ठेवला जातो. वाशीतील एका ज्येष्ठ नागरिकांला या विश्वासाची किंमत चुकवावी लागत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, प्रतिनिधी

सध्या व्हॉट्सअॅपवर आलेल्या सर्व गोष्टींना खरं मानलं जातं. त्याची शहानिशा न करता विश्वास ठेवला जातो. वाशीतील एका ज्येष्ठ नागरिकांला या विश्वासाची किंमत चुकवावी लागत आहे. शेअर मार्केट आणि ऑनलाइन गुंतवणुकीत मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत वाशीमधील ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल (1,60,50,000) दीड कोटींची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

फिर्यादीचे तपशील

पीडित व्यक्ती विपिन रमणीकलाल गांधी (71) वाशीत राहतात. त्यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. विपिन यांना  व्हॉट्सअॅपवरील फसवणूक करणाऱ्या गुंतवणूक ग्रुपमध्ये जॉइन करून घेतलं होतं. येथेच त्यांना दीड कोटींचा गंडा घालण्यात आला. 

कशी केली फसवणूक? 

“NB-Deposit Services WB1120” या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर मार्केट आणि IPO बाबत माहिती दिली जाते आणि प्रचंड नफा मिळेल असे सांगून विश्वास संपादन करण्यात आला. सायबर गुन्हेगारांनी अत्यंत नियोजनपूर्ण ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची फसवणूक केली.  “NB TRUSTED PARTNER” नावाचे अॅप आणि m.nbinvests.com ही लिंक वापरून गुंतवणुकीचे बनावट डॅशबोर्ड तयार केले. 6 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर करण्याचे निर्देश देत एकूण 1.60 कोटी उकळले. अॅपवर दाखवलेला नफा, गुंतवणूक व्यवहार आणि सर्व रिपोर्ट बनावट असल्याचे तपासात उघड झाले.

Advertisement

नक्की वाचा - Cyber Crime : 'सुंदरी'चा फोटो दिसला अन् 3 मिनिटात बँक खातं रिकामं; ऑनलाइन लुटीची नवी क्लृप्ती, अलर्ट राहा!

आरोपी कोण?

व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन

फसवणूक करणाऱ्या मोबाइल क्रमांकांचे वापरकर्ते

बनावट अॅप आणि वेबसाईटचे निर्माते

पैसे जमा झालेल्या विविध बँक खात्यांचे धारक

सर्व आरोपी सध्या फरार असून नवी मुंबई सायबर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्ह्यांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली जात आहे. तरीदेखील लालसा आणि भीती दाखवून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे.

Advertisement

सायबर गुन्हेगार प्रमुखतः दोन पद्धती वापरतात :

1. भीती दाखवून – ओटीपी किंवा बँक तपशील उकळणे

2. लालसा दाखवून – शेअर मार्केट, क्रिप्टो, IPO मध्ये तात्काळ मोठा नफा मिळेल असे सांगणे

नागरिकांनी खालील गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात:

अज्ञात लिंकवर क्लिक करू नये

गैर-प्रमाणित अॅप्स इंस्टॉल करू नयेत

अनोळखी खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करू नयेत

सायबर फसवणूक झाल्यास काय करावे?

सायबर हेल्पलाइन 1930 वर तात्काळ कॉल करा

नवी मुंबई सायबर पोलीस ठाणे (नेरूळ) येथे तक्रार नोंदवा

नवी मुंबई पोलिसांकडून शाळा, महाविद्यालये, सोसायटी याठिकाणी सायबर जागरूकता कार्यक्रम सातत्याने घेण्यात येत असले तरी शहरात मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड होत असल्यामुळे नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Topics mentioned in this article