- मुझफ्फरनगर जिल्ह्यातील चरथावल परिसरात मादी माकडाने 3 महिन्यांच्या मुलीला दीड तास कुशीत धरले होते
- माकडाने मुलीला कोणतीही इजा न करता मातृत्वाच्या भावनेने तिला आपले पिल्लू समजून घेतले होते
- माकडाने घरातील लोकांवर हल्ला केला आणि काही जखमी झाले, मात्र मुलीला सोडायला तयार नव्हती
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील चरथावल परिसरातून एक अंगावर शहारे आणणारी, मात्र तितकीच भावूक करणारी घटना समोर आली आहे. एका मादी माकडाने चक्क एका 3 महिन्यांच्या लहान मुलीला दीड तास आपल्या कुशीत धरून ठेवले होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. येथील जाहिद स्कूलच्या परिसरात ही घटना घडली. याला निसर्गाचा एक अजब चमत्कारच म्हणायला हवा. एका माकडाने 3 महिन्यांच्या कलसुम नावाच्या मुलीला आपल्या ताब्यात घेतले होते. तब्बल 90 मिनिटे हे माकड मुलीला घेऊन बसले होते, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
चरथावल येथील तहसीन यांच्या घरात मंगळवारी 21 एप्रिलला एक माकड शिरले होते. माकडाने घरात झोपलेल्या 3 महिन्यांच्या 'कलसुम' नावाच्या मुलीला जवळ घेतले. त्यानंतर तिला कुरवाळू लागली. घरच्यांनी माकडाला हाकलण्याचा प्रयत्न केला असता, ती अधिकच आक्रमक झाली. धक्कादायक म्हणजे या माकडाने कुटुंबीयांवर हल्ला करून काहींना जखमी केले, पण मुलीला मात्र साधी ओरखडाही येऊ दिला नाही. ती त्या लहान मुलीला आपल्या कुशीत घेवून बसली होती. त्यावेळी सर्व जण पाहत राहीले.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आणि प्राणीमित्र सनी यांना पाचारण करण्यात आले. प्राणीमित्र सनी यांच्या मते, "संबंधित मादी माकडाचे स्वतःचे पिल्लू गमावले असावे, त्यामुळे मातृत्वाच्या भावनेपोटी ती या लहान मुलीला आपले बाळ समजत होती." अखेर दीड तासाच्या प्रयत्नांनंतर माकडाचे लक्ष विचलित करून मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबीयांनी ही सुटकेचा निश्वास टाकला. हा थरार गावातले सर्व लोक पाहात होती. त्यावेळी तिथे मोठी गर्दी ही झाली होती. अनेकांनी त्याचा व्हिडीओ ही बनवला. तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
माकडाने घरात धुमाकूळ घालत घरातील मंडळींवर हल्ला केला. दीड तास काळजाचा ठोका चुकवणारा हा खेळ सुरू होता. बाळ रडत होतं, पण माकड तिला सोडायला तयार नव्हतं. अखेर पोलिसांच्या मदतीने पशुप्रेमी सनी तिथे पोहोचले. प्राणीमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मादी माकडाची भावना बाळाला इजा करण्याची नव्हती. ती बाळाला स्वतःचं पिल्लू समजून मायेने जवळ घेत होती. अखेर युक्तीने माकडाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात आले आणि कलुमला आईच्या कुशीत परत देण्यात आले. या थरारक घटनेचा व्हिडिओ आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय ठरला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world