निलेश बंगाले, प्रतिनिधी
वर्धा पोलिसांच्या पुढाकारामुळे तब्बल 15 वर्षांनंतर मुलीची आणि तिच्या कुटुंबीयांची गाठभेट झाली आहे. वर्धा पोलिसांकडून ऑपरेशन मुस्कान 13 ही मोहीम राबवण्यात आली. 15 वर्षापूर्वी हरवलेल्या मुलीचा छडा लावण्यात आला आणि कुटुंबीयांची भेट घडवून आणण्यात आली. 18 डिसेंबर 2024 रोजी वर्ध्यातील नियंत्रण कक्षात हरियाणातून एक फोन आला होता. हा फोन मूळच्या वर्ध्याच्या असलेल्या इशाचा होता. आश्रमातील राजेश कुमार यांनी फोनवरुन इशाबद्दलची माहिती दिली. 21 वर्षांची इशा ही सोनिपत येथे राही आश्रमामध्ये राहते. ती वर्ध्याची असल्याचं सांगतेय. 6 वर्षांपूर्वी ती हरियाणात आली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इशाने सविस्तर सांगितलं. तिच्या आईचं नाव कविता, वडिलांचं नाव चिंधु व भावाचं नाव अनिकेत असल्याचं ती सांगत होती. यावेळी तिने घरासंदर्भात अनेक खूणा सांगितल्या. मी वर्ध्याची असून माझ्या मोहल्यात एका निळ्या रंगाचं मुलामुलींचे सरकारी हॉस्टेल आहे. जवळच दोन सरकारी शाळा आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. मला लहानपणी माझी आई कविता आणि आसाराम नावाच्या व्यक्तीने वर्ध्याहून सोनिपत हरियाणा येथे पळवून आणलं होतं. काही वर्षानी माझी आई कविता मला आणि आसाराम नावाच्या व्यक्तीला इथचं सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत कोठे तरी निघून गेल्याचं मुलीने सांगितलं. त्यानंतर काही दिवसांनी स्थानिक आणि पोलिसांनी मुलीला राही आश्रम सोनिपत हरियाणा येथे आणून सोडलं. तेव्हापासून ती हरवलेली इशा आश्रमात राहते. सध्या ती बीए द्वितीय वर्षाला शिकतेय.
यानंतर इशा आणि तिच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू झाले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा आणि वर्धा जिह्यातील मिसींग ग्रुपवर याबाबत माहिती व मुलीचा फोटो प्रसारीत करुन माहिती मागवण्यात आली. तसंच स्वतः पोलीस स्टेशन सेवाग्राम, रामनगर, सावंगी मेघे, वर्धा शहर येथील सन 2005 पासूनचे 2020 पर्यंतचे मिसींग रजिस्टर चेक केले. 2010 मध्ये दोघीही बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावरुन राजेंद्र ढोके यांचा पत्ता शोधण्यात आला. शेवटी त्यांचा संपर्क क्रमांकही सापडला. हरियाणातून व्हिडिओ कॉल करून इशाचे मामा, भाऊ, चुलत भाऊ आणि घरातील इतर सदस्यांसोबत बोलणं करून दिलं. यावेळी इशाने सर्वांना ओळखलं आणि अखेर तब्बल 15 वर्षांनंतर इशाला तिचं कुटुंब सापडलं.