बदलापुरातील (Badlapur Crime) चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचे एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter Fake) फेक असल्याचं न्यायालयाच्या चौकशी समिती अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळे यामध्ये सहभागी असलेल्या त्या पाच पोलिसांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं समजते. दरम्यान अक्षय शिंदेच्या वकिलांनी पहिल्यांदाच 42 पानाच्या अहवालात काय काय आहे, याची माहिती दिली.
- अक्षय शिंदेच्या चेहऱ्यावर आणि गुडघ्यावर जखमा असल्याचं समोर आलं आहे.
- पोलिसांच्या बंदुकीवर अक्षयच्या हाताचे ठसेही नव्हते.
- अक्षय शिंदेच्या हातावर गनपावडर लागलेली नाही.
- अक्षय शिंदेच्या हातात बेड्या होत्या असं आधी सांगितलं, नंतर पाणी पिण्यासाठी त्याच्या बेड्या उघडल्याचं पोलीस म्हणाले. मात्र पाण्याच्या बाटलीवर अक्षयच्या हाताचे ठसे नाहीत.
- अक्षयवर अवघ्या तीन फुटावरून गोळी झाडण्यात आली. पॉईंट ब्लँकनी त्याच्यावर गोळी झाडल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं आहे.
- ज्या ठिकाणी हा एन्काऊंटर झाला त्या ठिकाणी एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला खाडी आहे.
- याच ठिकाणी पोलिसांनी वारंवारं एन्काऊंटर केल्याचा आरोपही केला जात आहे.
- पोलिसांनी तेच ठिकाण अक्षयसाठी निवडले.
- पोलिसांनी अक्षयचं एन्काऊंटर करण्यासाठीच पत्नीचा खोटा एफाआयआर दाखल केला असा आरोप अक्षयच्या वकिलांनी केला आहे.
नक्की वाचा - Yogesh Kadam: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा अजब दावा; पावसावर खापर फोडलं!
पोलिसांचा दावा काय?
अक्षय शिंदे याचा 23 सप्टेंबर रोजी पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. आरोपी अक्षय शिंदे याच्याविरोधात त्याच्या पहिल्या पत्नीने तक्रार दाखल केली होती. त्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं होतं. या तपास पथकातील पोलीस अधिकारी न्यायालयाचं ट्रान्सफर वॉरंट घेऊन तळोजा मध्यवर्ती कारागृहात गेले होते. तेथून आरोपी अक्षय शिंदेला ठाण्याला घेऊन येत असताना आरोपीने पोलिसांची पिस्तुल हिसकावून घेतली. आणि पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय शिंदेने पोलिसांच्या दिशेने 3 राऊंड फायर केले, त्यापैकी 1 राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला व 2 राऊंड इतरत्र फायर झाले. संरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने एक गोळी फायर केली. यात अक्षयचा मृत्यू झाला. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला गोळी लागली. ज्युपिटर रुग्णालयात इतर पोलिसांवरही उपचार करण्यात आले. मुंब्रा-बायपासजवळ आई मुंब्रा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी ही घटना घडल्याची माहिती ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world