रामराजे शिंदे, प्रतिनिधी
West Bengal Assembly Election Result 2026 : पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत तृणमूल काँग्रेसला धोबीपछाड दिलंय. पश्चिम बंगालचा सामना थेट मोदी विरुद्ध दीदी असा होता. मोदींसाठी ही प्रतिष्ठेची तर ममता बॅनर्जींसाठी ही अस्तित्वाची लढाई होती. मात्र यंदा भाजपने बंगालची सत्ता खेचून आणली. 2021 च्या तुलनेत 2026 च्या निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी केल्याचं दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने 192 जागांवर विजय मिळवलाय. तर तृणमूल काँग्रेसला अवघ्या 95 जागाच जिंकता आल्या आहेत. म्हणजेच गेल्या निवडणुकीत भाजपला 100 चा आकडा गाठता आला नव्हता. यंदाच्या निवडणुकीत भाजपने बदला घेत तृणमूलला 100 चा आकडा गाठू दिला नाही. काँग्रेसला या निवडणुकीत देखील सपशेल अपयश मिळालंय.
भाजपने हा एकतर्फी विजय मिळवलाय. मात्र हा विजय म्हणजे गेल्या 10 वर्षांचा खडतर प्रवास होता. 2016 च्या निवडणुकीत भाजपला अवघ्या 3 जागांवर विजय मिळाला होता. मात्र 2021 च्या निवडणुकीत भाजपने 77 जागांची मजल मारली. आणि 2026 च्या निकालात भाजपने दीदीचं सरकार उलथवून लावलंय. दरम्यान या पराभवानंतर ममता बॅनर्जींना राग अनावर झाला आहे. पण ममता बॅनर्जींचं सरकार कोसळण्यामागची कारणं नेमकी काय आहेत ती देखील जाणून घेऊयात.
ममता दीदींच्या पराभवाची 7 कारणं ?
- गेल्या 15 वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची एकहाती सत्ता होती. त्यामुळे भाजपला सत्ताविरोधी लाटेचा फायदा झाला.
- भाजपकडून बंगालमध्ये आक्रमक प्रचार करण्यात आला. मोदी, शाहांपासून भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले होते.
- आयकर आणि ईडीच्या कारवायांचाही तृणमूलला मोठा फटका बसलाय. तृणमूलच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळली होती.
- महिला सुरक्षेचा मुद्दादेखील या निवडणुकीत चांगलाच गाजला. मेडिकल कॉलेज बलात्कार प्रकरण तृणमूल काँग्रेसला चांगलंच भोवलं.
- मतदार यादी आणि SIR वाद या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा होता. SIR प्रक्रियेत 90 लाख मतदार वगळण्यात आले होते. ज्याचा फटका तृणमूल काँग्रेसला बसला.
- यंदाच्या निवडणुकीत 91 टक्के विक्रमी मतदान झालं. या विक्रमी मतदानाचाही भाजपला फायदा झाला. वाढलेलं मतदान भाजपच्या बाजुने फिरलं.
- भाजपकडून हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यात यश आलं. दुसरीकडे मुस्लीम मतांनी ममता दीदींना तारलं नाही.
15 वर्षानंतर पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर, सत्ताविरोधी लाटेची कारण काय ?
पश्चिम बंगालची निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई होती. 2014 साली केंद्रात भाजपची सत्ता आली. 2019 च्या निवडणुकीत तर भाजपला एकतर्फी बहुमत मिळालं होतं. लोकसभेचं यश विधानसभा निवडणुकांमध्ये झळकलं. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिसा सगळीकडेच भाजपची सत्ता आली. पण पश्चिम बंगालमध्ये भाजपला आपले पाय रोवता आले नाहीत. ही सल भाजप हायकमांडच्या मनात कायम होती. मात्र भाजपने या निवडणुकीत सगळा हिशोब चुकता केला.
ममता बॅनर्जी आता विरोधी बाकावर दिसणार हे निश्चित झालंय. ममता बॅनर्जी या जिंकल्या तरी लढतात आणि हरल्या तरीही. त्यांची खरी ताकद सत्तेत नाही; तर ती संघर्षात आहे. आता प्रश्न असा की, त्या पुन्हा एकदा ‘रस्त्यावरची नेता' होणार की सत्तेच्या पराभवाने त्यांची राजकीय ऊर्जा कमी होणार हे येणारा काळच ठरवेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world