निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय? काय असतात आचारसंहितेमध्ये नियम

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

निवडणुका जवळ आल्या की आचारसंहिता हा शब्द सतत कानावर पडतो. निवडणूक आयोगानं निवडणुकांच्या तारखांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होते. निवडणुकीच्या काळात सत्ताधारी तसंच विरोधकांना आचारसंहितेचं पालन करणे अनिवार्य आहे. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहितेच्या कालावधीत कोणते नियम असतात हे पाहूया

आचारसंहिता म्हणजे काय?

आचारसंहितेला इंग्रजीत 'कोड ऑफ कंडक्ट' असं म्हणतात. व्यक्ती, गट किंवा संस्थेसाठी निर्धारित सामाजिक व्यवहार, नियम याला आचारसंहिता म्हटलं जातं. आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर लागू होते. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं आणि काय करु नये याचा नियमावलीचा यामध्ये समावेश असतो. या नियमावलीला आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जातं.

निवणुका मुक्त आणि पारदर्शकपणे व्हाव्यात, या हेतूने हे मार्गदर्शक तत्व ठरवण्यात आलं आहे. या आचारसंहितेचा भाग करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे आचारसंहितेची शिस्त पाळणं अनिवार्य आहे. 

काय आहेत नियम?

निवडणुका लढवणारे सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी  निवडणूक आयोग एक आदर्श आचारसंहिता जारी करते. या आचारसंहितेचं पालन करणे या सर्वांसाठी बंधनकारक असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार, सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे. आचारसंहितेचं मॅन्युएल निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येतं. 


* मतदारांना पैसे वाटणे, महागड्या भेटवस्तू देणे, लालूच किंवा आमिष दाखवणे या सर्व प्रकारांना आचारसंहिता काळात सक्त मनाई असते. 

* या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकासकामांची घोषणा करता येत नाही.

* सत्तारुढ पक्षाच्या मंत्र्याला रस्ते, पाणी, वीज देऊ अशी आश्वासनं देता येत नाहीत. 

* निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही.

* मतदारांना धमक्या देणं, दबाव आणणं हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे

* आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय सभा किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची संमती आवश्यक असते.

* आचारसंहिता काळात विरोधकांचा पुतळा जाळणं, अशा प्रकारचा निषेध नोंदवणंही नियमांत बसत नाही.

आचारसंहितेचे फायदे काय?

 निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी आचारसंहिता आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते. आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते.  त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारालाही यामुळे प्रतिबंध बसतो.

Topics mentioned in this article