जाहिरात
Story ProgressBack

Bengaluru Water Crises: बंगळुरुतील नागरिकांवर टॉयलेटसाठी मॉल्समध्ये जाण्याची वेळ का आली?

भारताचे 'आयटी हब' असलेल्या बंगळुरु शहराला गेल्या 500 वर्षातील सर्वात भीषण पाणी टंचाई सहन करावी लागतीय.

Read Time: 3 min
Bengaluru Water Crises: बंगळुरुतील नागरिकांवर टॉयलेटसाठी मॉल्समध्ये जाण्याची वेळ का आली?
मुंबई:

कर्नाटकची राजधानी असलेलं बंगळुरु हे शहर एकेकाळी थंड आणि आल्हादायक हवेमुळे पेन्शर्स लोकांचं आवडतं शहर होतं. वर्षातील बाराही महिने थंड राहणाऱ्या या शहराचा बंगळुरुकरांना मोठा अभिमान होता. आता उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच बंगळुरुकरांना गेल्या 500 वर्षातील सर्वात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. मुख्यमंत्री सिद्धरामाय्या यांच्या घराला टँकरनं पाणीपुरवठा होतो.  उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या घरातील बोअरवेलचं पाणी आटलंय. कोट्यवधी किंमतीच्या घरांमध्ये राहणाऱ्या बंगळुरुकरांवर टॉयलेटसाठी मॉलमध्ये जाण्याची वेळ आलीय. 

सर्वात भीषण पाणीटंचाई

देशात गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढलेल्या शहरांमध्ये बंगळुरुचा समावेश आहे. उदारीकरणानंतर भारताचं 'आयटी हब' म्हणून बंगळुरुचा झपाट्यानं विकास झाला. जगभरातील आयटी कंपन्यांनी बंगळुरुला त्यांचं मुख्य केंद्र केल्यानं भारतामधील 'सिलिकॉन व्हॅली' म्हणूनही बंगळुरु ओळखलं जातं. त्याचबरोबर देशातील अनेक स्टार्टअप उद्योगांची हे शहर गंगोत्री आहे. 

बंगळुरुची लोकसंख्या 1.5 कोटी असून त्यासाठी रोज 200 कोटी लीटर पाण्याची गरज आहे. कावेरी नदी आणि खासगी बोअरवेल हे शहराला मिळणाऱ्या पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. कमी पावसामुळे कावेरीचा जलसाठा खालवला असून बोअरवेलही आटत चालले आहेत.

बंगळुरु जलनिगमनं दिलेल्या माहितीनुसार शहरात 10995 बोअरवेल असून त्यामधील 1214 बोअरवेलमधील पाणी पूर्णपणे आटलंय. तर 3700 बोअरवेलमधील पाणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

वाढत्या पाणीटंचाईमुळे पिण्याचे पाणी वाहनं धुण्यासाठी तसंच झाडांना पाणी घालण्यासाठी वापरण्यावर बंदी घालण्याचे आदेश प्रशासनानं दिलेत. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर 5000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी रोजची आंघोळ तसंच टॉयलेटसाठी पाणी वापरताना काटकसर करावी असं आवाहनही प्रशासनानं केलंय.

पाणी आहे त्या भागातील नागरिकांवर काटकसरीची वेळ आलीय. तर काही भागांमध्ये तर पाणी गायब झाल्यानं त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय. 'डेक्कन हेरॉल्ड'नं दिलेल्या वृत्तानुसार आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी पाणी टचांईमुळे 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय निवडत गावाकडचा रस्ता पकडलाय. कोव्हिड लाट ओसरल्यानंतर कंपन्यांनी पुन्हा एकदा सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये काम करण्यासाठी बोलावलं होतं. त्यांच्यासमोर या पाणी टंचाईमुळे नवा संकट उभं टाकलंय.

'आमच्या भागात आठवडाभर पाणी आलेलं नाही. टॉयलेटमध्ये फ्लश न केल्यानं दुर्गंधी येतीय. त्यामुळे नित्यक्रम करण्यासाठी मॉल्समधील टॉयलेटचा वापर करण्याची वेळ आलीय,' अशी माहिती रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युझरनं दिलीय.  शहरातील शाळा आणि कोचिंग क्लासेसनाही या पाणीटंचाईचा फटका बसलाय. 

ही वेळ का आली?

बंगळुरु शहराच्या विस्तारानंतर शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामं झाली. त्यासाठी पाण्याचा अतिरिक्त वापर झाला. त्यामुळे ही वेळ आल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करतायत. 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला 262 तलाव होते. आता फक्त 81 तलाव शिल्लक आहेत. वृषाभवती, अर्कावती, दक्षिण पिनाकिनी, चिन्नार या बंगळुरुच्या जवळपासच्या नद्यांचं रुपांतर नाल्यांमध्ये झालंय. शहरातील 94 टक्के भागांमध्ये सिमेंटचं जंगल उभं राहिलं असून त्याची गरज भागवण्यासाठी पाण्याचा सातत्यानं उपसा केला जातोय. 10 वर्षांपूर्वी 250 फुटांपर्यंत  पाणी मिळत असे आता पाण्याची पातळी 1500 फुटांपेक्षाही खाली गेल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिलीय.  

उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच बंगळुरुतील पाणी टंचाई तीव्र झालीय. आगामी लोकसभा निवडणुकीतही हा मोठा मुद्दा ठरु शकतो. पावसाळ्यात तसंच कावेरी योजनेचा पाचवा टप्पा सुरु झाल्यानंतर ही टंचाई नियंत्रणात येईल, पण बंगळुरुची होत असलेल्या अमर्यादित वाढीमुळे हा कायमस्वरुपी उपाय नसल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करतायत.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination