 
                                            Mamata Kulkarni latest News : चित्रपट अभिनेत्री ते संन्यास असा प्रवास करणाऱ्या ममता कुलकर्णीवर गोरखपूरमध्ये पत्रकार परिषदेत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबतच्या संबंधांबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. ममताने दिलेल्या उत्तरांनंतर ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. ममताने याबद्दल खुलासा करताना म्हटलंय की तिचे आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत कधीही संबंध नव्हते. छोटा राजनसाठी काम करत असल्याचा आरोप असलेल्या विकी गोस्वामीशी मात्र आपले संबंध असल्याचे ममता कुलकर्णीने म्हटलंय.
ही बाब ममता कुलकर्णीने दहा महिन्यांपूर्वी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत कबुल केली होती. नव्वदच्या दशकात ममता कुलकर्णीचे नाणे बॉलिवूडमध्ये खणखणीतपणे वाजत होते, मात्र ती अचानकपणे चित्रपटसृष्टीतून गायब झाली. तिचे अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध असल्याच्या वृत्तामुळे त्याकाळी खळबळ उडाली होती. हे सगळं सुरू असतानाच आणखी एक बॉलीवूड अभिनेत्री होती, जिचे दाऊद गँगमधल्या काही लोकांशी मधुर संबंध असल्याच्या चर्चांमुळे अनेकांना धक्का बसला होता. या अभिनेत्रीचं नाव आहे अनिता अयूब, जी मूळची पाकिस्तानची आहे.
मॉडेल म्हणून पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले
बॉलिवूड अभिनेत्री, डॉनची प्रेयसी आणि पाकिस्तानी हेर म्हणून अनिताकडे पाहीलं जात होतं. 1989 मध्ये अनिताने मिस एशिया पॅसिफिक आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत मॉडेल म्हणून पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. तिने अनेक टीव्ही जाहिरातींसाठी मॉडेलिंग केले होते. 1992 मध्ये तिने पाकिस्तानी मालिका "गर्दिश"मधून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि निर्माते देव आनंद यांचे अनिताने लक्ष वेधले होते आणि त्यांनी तिला त्यांच्या आगामी चित्रपट "प्यार का तराना"मध्ये ब्रेक दिला होता.
नक्की वाचा >> धुळ्यात भरदिवसा पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा, चोरट्यांनी कर्मचाऱ्यावर पिस्तुल रोखलं..थरारक CCTV Video आला समोर
तिने या चित्रपटात नुसता अभिनयच नाही केला तर पटकथा आणि दिग्दर्शनही केलं होतं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत सुमार कामगिरी करणारा ठरला. देव आनंद यांनी काढलेले चित्रपट ओळीने फ्लॉप झाले होते, त्यात "प्यार का तराना"चीही भर पडली. असं असलं तरी देव आनंद यांना अनिता हिचा अभिनय आवडला होता आणि त्यांनी पुढच्या चित्रपटासाठीही तिलाच अभिनेत्री म्हणून घेण्याचा निर्णय घेतला. 1994 साली देव आनंद यांनी "गँगस्टर" चित्रपट बनवला होता, ज्यात अनिता अयूब ही पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत होती.
डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम या दोघांची भेट झाली अन् नंतर..
दरम्यानच्या काळात अनिता अयूब आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम या दोघांची भेट झाली. या दोघांच्या भेटी वाढत गेल्या आणि अनीसला अनिता अयूब प्रचंड आवडायला लागली. अनीसने अनिता अयूबला मी तुला मोठी अभिनेत्री बनवेन असं सांगितलं. त्याने जावेद सिद्दीकी नावाच्या एका चित्रपट निर्मात्याला फोन केला आणि अनिताला त्याच्या पुढील चित्रपटात मुख्य भूमिकेत घेण्यास सांगितले. त्यावेळी जावेद सिद्दीकी हा मिथुन चक्रवर्ती, विनोद खन्ना आणि राज बब्बर यांच्यासोबत मल्टीस्टारर चित्रपट बनवण्याची तयारी करत होता. डी गँगने त्याकाळी बॉलिवूडमध्ये आपली बऱ्यापैकी दहशत निर्माण केली होती. यामुळे जावेदला अनीसची विनंती मान्य करावी लागली. जावेदने अनिताला एक लाख रुपये सायनिंग अमाउंटही दिली होती.
नक्की वाचा >> पनवेलमध्ये भयंकर घटना! SPY कॅमेरा लावून महिलेचा आंघोळीचा व्हिडीओ काढला, पोलिसांनी फार्म हाऊसवर धाड टाकली अन्..
काही दिवसांनंतर जावेद आणि अनिता अयूबमध्ये वाद झाला. जावेदने अनिताकडे आगाऊ दिलेली रक्कम परत मागितली. जावेदने अनिताला सांगितलं की तो तिला चित्रपटात घेणार नाही, तिने दुसरीकडे काम शोधावे. या सगळअयानंतर अनीस इब्राहीम जावेदवर भडकला होता. अनिताशी जावेदने जरा जास्तच जवळीक साधल्याचे त्याला कळाले, यामुळे अनीसने जावेदला ठार मारण्याची सुपारी दिली. अबू सालेम याला जावेदला मारण्याची सुपारी देण्यात आली होती. सालेमने त्याचा शूटर सलीम तुकाराम याला 50 हजार रुपये दिले, ज्यानंतर 7 जून 1994 रोजी सलीमने जावेदला दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार मारले. बायकोसोबत बाहेर जाण्यासाठी जावेद निघाला असताना त्याची हत्या करण्यात आली होती.
अबू सालेमने एटीएसला दिलेल्या जबाबात ही बाब कबूल केलीय. या घटनेनंतर अनिता अयूब पोलिसांच्या रडारवर आली. अनितावर असाही संशय होता की ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असावी. अनिताच्या मदतीने पाकिस्तान मोठा कट रचत असल्याचा संशय होता. मात्र पोलिसांनी तिची चौकशी करण्यापूर्वीच ती अमेरिकेला निघून गेली, तिथे तिने गुजराती माणसाशी लग्न केलं आणि तिथेच स्थायिक झाली. अनिताचं लग्न फार काळ टीकलं नाही. त्यानंतर तिने एका पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
