- भारतीय जनता पक्षाने नितीन नवीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती
- नितीन नवीन बिहार सरकारमध्ये पथ निर्माण आणि नगर विकास या विभागाचे मंत्री
- नितीन नवीन पटना येथील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून सलग विजय मिळवत आहेत
Nitin Nabin BJP Working President: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक गेल्या काही काळापासून प्रलंबित आहे. मात्र, पक्षाला लवकरच नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळेल, अशी चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजपने रविवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत नितीन नवीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी घोषणा केली आहे. या नियुक्तीचा अर्थ असा आहे की, भाजपला नवा पूर्णवेळ अध्यक्ष मिळेपर्यंत नितीन नवीन हे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांची निवड करण्याची परंपरा भाजपमध्ये आहे, जी एक महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. भाजपमध्ये अनेकदा कार्यकारी अध्यक्षच पुढे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहेत.
कार्यकारी अध्यक्ष म्हणजे काय?
नितीन नवीन यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनवण्याचा अर्थ स्पष्ट आहे. ते नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत पक्षाचे 'कप्तान' असतील आणि संघटनेची दैनंदिन कामे पाहतील. सध्या ते बिहार सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत. नितीन नवीन हे बिहार भाजपमधील एक कद्दावर नेते म्हणून ओळखले जातात.
कोण आहेत नितीन नवीन?
नितीन नवीन सध्या बिहार सरकारमध्ये पथ निर्माण (Road Construction) आणि नगर विकास (Urban Development) यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचे मंत्री आहेत.
राजकीय वारसा: ते पटना येथील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून सलग निवडून येत आहेत. त्यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे देखील भाजपचे निष्ठावान नेते होते. त्यांच्या निधनानंतर नितीन नवीन यांनी त्यांची राजकीय परंपरा समर्थपणे पुढे चालवली आहे.
प्रतिनिधित्व: नितीन नवीन हे कायस्थ समाजातून येतात आणि सध्या बिहार मंत्रिमंडळात या समाजाचे ते एकमेव प्रतिनिधी आहेत.
विजय आणि अनुभव:
त्यांनी सन 2006 मध्ये पोटनिवडणूक लढवून पहिल्यांदा विजय मिळवला. त्यानंतर 2010, 2015, 2020 आणि आता 2025 मध्येही त्यांनी विजय मिळवून दबदबा कायम ठेवला आहे.
- 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी आरजेडीच्या रेखा कुमारी यांचा 51,936 मतांनी पराभव केला.
- 2020 च्या निवडणुकीत त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव सिन्हा यांचा सुमारे 84 हजार मतांनी पराभव केला होता.
मंत्रिपदाचा अनुभव:
त्यांना पहिल्यांदा 9 फेब्रुवारी 2021 रोजी नितीश सरकारच्या मंत्रिमंडळात पथ निर्माण मंत्री म्हणून संधी मिळाली. त्यानंतर 25 मार्च 2024 आणि पुन्हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले, जिथे त्यांना पथ निर्माण तसेच शहरी विकास आणि गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मिळाली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world