- मुंबई क्राईम ब्रँचने साताऱ्यातील सावली गावात म्हशीच्या गोठ्यात एमडी ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केला आहे
- या कारखान्यातून पंधराशे कोटी रुपये किमतीच्या एमडी ड्रग्ज व 38 किलो द्रवपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे
- या प्रकरणी तीन बांगलादेशी कामगारांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
शांत आणि निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकाने चक्क एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सावली गावात चक्क एका म्हशीच्या गोठ्यात हा ड्रग्जचा कारखाना सुरू होता. गंभीर बाब म्हणजे ज्या कारखान्यातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त झाला त्या कारखान्याचा स्थानिक पोलिसांना थांगपत्ताही नव्हता. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाय या कारखान्याशी काही राजकीय संबंध ही उघड झाले आहे. ते सर्वात धक्कादायक म्हटले जाते.
शनिवारी पहाटे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने साताऱ्याच्या सावली गावात छापेमारी केली. म्हशीच्या गोठ्यात सुरू असलेल्या या कारखान्यात अंमली पदार्थ निर्मिती आणि कच्चा मालाचा साठा करण्यात आला होता. या कारवाईत 7 किलो 718 ग्रॅम एमडी ड्रग्स आणि 38 किलो द्रवपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. बाजारभावानुसार जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 15 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी तीन बांगलादेशी कारागीर आणि अन्य एक अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. दिवसभराच्या कारवाईनंतर सर्व आरोपींना घेऊन मुंबई पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना झालं आहे. पण या कारवाईचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटू लागलेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्वीट करत ड्रग्जच्या कारखान्याचा संबंध थेट उपमुख्यमंत्र्यांशी जोडला आहे. वोटचोरी करून सत्तेवर बसलेले फडणवीस-शिंदे-पवार सरकार आता “उडता महाराष्ट्र “ करूनच थांबणार आहे का? असा हल्लाबोल करत सरकारवर प्रश्नांची सरबत्तीच केली आहे.
सातारा ड्रग्ज प्रकरणात हर्षवर्धन सपकाळांनी सरकारला काही सवाल केले आहेत. पश्चिम बंगाल राज्यातील कामगार इतक्या दुर्गम ठिकाणी कोणाच्या मदतीने वास्तव्यास थांबले? ड्रग्स निर्मिती सुरू असलेल्या गोठ्याच्या मालकाकडून ओंकार दिघे नावाच्या माणसाने एकनाथ शिंदेच्या पक्षाचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्याकडे ही जागा वापरण्यास मागितली होती. या ओंकार दिघेला ड्रग्स निर्मिती स्थळावरूनच ताब्यात घेण्यात आलं होतं, परंतु त्याला कोणाच्या दबावामुळे सोडण्यात आले? ओंकार दिघे हा सावळी गावात कधीपासून वास्तव्यास आहे, कोणामुळे तो इकडे आला ? इतर जवळपास 40 कामगार या कामगारांसोबत काम करत होते त्यांचं काय झालं ? त्यांना पळून जाण्यात कुणी मदत केली? ज्याला आदल्या दिवशी 2 किलो MD ड्रग्जसह अटक केली, तो विशाल मोरे अजित पवार गटाचा पुण्यातील विद्यार्थी संघटनेचा प्रमुख आहे.
त्या विशाल मोरेचे ओंकार दिघे आणि प्रकाश शिंदे यांचे संबंध काय आहेत? प्रकाश शिंदे कारवाईच्या आदल्या रात्रीपर्यंत तेजस हॉटेलवर होते, त्या तेजस हॉटेलचा पोलिसांनी पंचनामा केला की नाही. महाराष्ट्राला ड्रग्सच्या विळख्यात लोटणाऱ्या या गंभीर घटनेवर गृहमंत्री अजून गप्प का आहेत? असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली आहे.गृहखातं कुणाला तरी लपवतंय असा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. इतर अमली पदार्थाच्या तुलनेत स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्याने नशेखोरांमध्ये सध्या एमडी ड्रग्जची चलती आहे. त्यातच अलिकडच्या काळात झालेल्या अंमलीपदार्थविरोधी कारवायांमध्ये एमडी ड्रग्ज जप्तीचं प्रमाणही कमालीचं वाढलं आहे. अशातच ड्रग्ज तस्करांना राजकीय पाठबळ मिळत असल्याबाबत विरोधकांनी केलेले आरोप जर खरे असतील तर ही गंभीर बाब म्हणावी लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world