जाहिरात

प्रियांका गांधींनी ज्यांना 'गोमूत्र तज्ज्ञ' म्हटलं, ते V Kamakoti कोण आहेत? सर्वांना माहिती हवी ही ओळख

Anti Paper Leak Bill :  'अँटी पेपर लीक' विधेयकावर लोकसभेतील चर्चेच्या दरम्यान काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या देशात जोरदार चर्चा आहे.

प्रियांका गांधींनी ज्यांना 'गोमूत्र तज्ज्ञ' म्हटलं, ते V Kamakoti कोण आहेत? सर्वांना माहिती हवी ही ओळख
V Kamakoti: व्ही. कामाकोटी हे सध्या आयआयटी मद्रासचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई:

Anti Paper Leak Bill Debate :  'अँटी पेपर लीक' विधेयकावर लोकसभेतील चर्चेच्या दरम्यान काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या देशात जोरदार चर्चा आहे. देशातील परीक्षा पद्धतीमध्ये मोठे बदल करण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विशेष टास्क फोर्सची घोषणा केली आहे. मात्र, या टास्क फोर्समधील एका सदस्याचा उल्लेख प्रियांका गांधी यांनी थेट 'गोमूत्र तज्ज्ञ' असा करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रियांका गांधी यांनी थेट कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा इशारा या समितीमधील सदस्य व्ही. कामाकोटी यांच्याकडं होता, हे स्पष्ट आहे. प्रियांका गांधी यांनी ज्यांना हिणवलं ते कामाकोटी नेमके कोण आहेत? त्यांचे आजवरचे कार्य काय आहे? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत?

कोणत्या समितीवर विचारला प्रश्न?

नीट परीक्षेतील पेपर फुटीचे प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या मोठ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ही उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएच्या परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. 

या समितीत माजी इस्रो प्रमुख एस. सोमनाथ, माजी आयबी संचालक तपन डेका, माजी शिक्षण सचिव अनिता करवाल आणि आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामाकोटी यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. याच समितीतील व्ही. कामाकोटी यांच्या नावावरून प्रियांका गांधी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला.

( नक्की वाचा : 'राष्ट्रविरोधी शक्ती गैरफायदा घेतील म्हणून...'; Dharmendra Pradhan यांनी राजीनामापत्रात काय सांगितलं?
 

काय आहे वादग्रस्त वक्तव्य?

लोकसभेत बोलताना प्रियांका गांधी यांनी या नव्या टास्क फोर्सवर थेट निशाणा साधला. या नव्या समितीत एक माजी आयबी प्रमुख आहेत, एक आयटी कंपनीचे मालक आहेत आणि एक गोमूत्र तज्ज्ञ आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. देशातील विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या आणि परीक्षा पद्धतीत बदल करणाऱ्या समितीत अशा व्यक्तीचा समावेश का करण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर संसदेत मोठा गोंधळ झाला. भाजपा खासदारांनी यावर आक्षेप घेतला. 

व्ही.कामाकोटी कोण आहेत?

ज्या व्ही. कामाकोटी यांच्यावर प्रियांका गांधी यांनी टीका केली, ते देशातील अत्यंत प्रतिष्ठित आणि नामांकित संगणक शास्त्रज्ञ आहेत. व्ही. कामाकोटी हे सध्या आयआयटी मद्रासचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आयआयटी मद्रासमधूनच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये एमएस आणि पीएचडी पूर्ण केली आहे. 2001 मध्ये ते याच संस्थेत प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि जानेवारी 2022 मध्ये त्यांनी संचालकपदाची सूत्रे हाती घेतली. संगणक रचना, माहिती सुरक्षा आणि व्हीएलएसआय डिझाइन हे त्यांच्या अभ्यासाचे मुख्य विषय आहेत.

( नक्की वाचा : JP Nadda: काँग्रेसशासित राज्यांमध्ये पेपर फुटले तेव्हा मौन का? जेपी नड्डांचा राहुल गांधींना थेट सवाल )
 

 पहिला स्वदेशी मायक्रोप्रोसेसर बनवणारे शास्त्रज्ञ

व्ही. कामाकोटी यांची ओळख केवळ एका संस्थेचे संचालक एवढीच नाही, तर भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे योगदान त्यांच्या नावे आहे. कामाकोटी आणि त्यांच्या संशोधन पथकाने भारताचा पहिला स्वदेशी मायक्रोप्रोसेसर 'शक्ती' तयार केला आहे. याशिवाय ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने स्थापन केलेल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टास्क फोर्सचे अध्यक्षपदही त्यांनी भुषवले आहे. आयआयटी मद्रासमध्ये असताना त्यांनी जेईईचे अध्यक्ष आणि औद्योगिक सल्लागार विभागाचे सहयोगी डीन म्हणूनही काम पाहिले आहे.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार

तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातील अप्रतिम योगदानाबद्दल व्ही. कामाकोटी यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याच वर्षी त्यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगिरीबद्दल केंद्र सरकारकडून 'पद्मश्री' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. 

याशिवाय डीआरडीओ अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड, आयईएसए टेक्नो व्हिजनरी अवॉर्ड, एसीसीएस लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, आयबीएम फॅकल्टी अवॉर्ड आणि वासविक इंडस्ट्रियल रिसर्च अवॉर्ड यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.  त्यांच्याकडे अब्दुल कलाम तंत्रज्ञान नवोपक्रम राष्ट्रीय फेलोशिपही आहे.

भाजपाकडून प्रत्युत्तर आणि संसदेत जोरदार खडाजंगी

प्रियांका गांधी यांच्या या टीकेवर भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत उत्तर दिले. देशातील एका आघाडीच्या शास्त्रज्ञाचा आणि प्राध्यापकाचा असा अपमान होणे दुर्दैवी आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. कामाकोटी हे कृत्रिम बुद्धिमत्ता टास्क फोर्सचे माजी प्रमुख राहिले आहेत. 

विरोधी पक्षातील एका सदस्याने कामाकोटी यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडण्याचा प्रयत्न केला असता, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले असतील तर त्यात काहीही चुकीचे नाही, असं उत्तर  ठाकूर यांनी दिलं. भावा-बहिणीची विचारसरणी एकच आहे आणि त्यांनी अशा महान शास्त्रज्ञांचा सन्मान करायला शिकले पाहिजे, अशी खरमरीत टीकाही भाजपाकडून करण्यात आली.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com