- A 62-year-old woman was defrauded of Rs 77 lakh by fake NCB officers after buying sleeping pills online
- She transferred Rs 3 lakh fearing arrest and later gave net banking access during a WhatsApp video call
- Police arrested five accused, including one who pretended to be a 'good cop' to gain trust and access
Digital Arrest Case : दिल्लीत सायबर गुन्हेगारांनी एका ६२ वर्षीय निवृत्त शिक्षिकेला 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली तब्बल ७७ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झोपेच्या गोळ्या खरेदी करण्याचा प्रयत्न या शिक्षिकेला इतका महागात पडेल याचा तिने स्वप्नातही विचार केला नसेल. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी जलदगती तपास करत ५ आरोपींना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
ऑगस्ट २०२४ मधील हे प्रकरण आहे. दिल्लीतील वसंत कुंज येथे एकट्या राहणाऱ्या नीरू नावाच्या निवृत्त शिक्षिका आपल्या न्यूरोलॉजिकल आजारासाठी दरमहा झोपेच्या गोळ्या ऑनलाईन मागवत होत्या. त्यांनी नेहमीप्रमाणे औषधे ऑर्डर केली आणि त्याबद्दल विसरून गेल्या. काही दिवसांनी त्यांना एका व्यक्तीचा फोन आला, ज्याने स्वतःला 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो' चा अधिकारी असल्याचे सांगितले. या अधिकाऱ्याने नीरूवर 'अवैध औषधे' खरेदी केल्याचा आणि दिल्लीत अंमली पदार्थांचा पुरवठा केल्याचा गंभीर आरोप केला.
(नक्की वाचा- Baramati Accident: अपघातात मुलगा अन् 2 नातींचा मृत्यू, 24 तासात पित्यानेही जीव सोडला, बारामतीत हळहळ)
बनावट एनसीबी अधिकाऱ्याच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या नीरू यांना आरोपीने बँक खात्याची पडताळणी करण्यासाठी काही रक्कम ट्रान्सफर करण्याचा किंवा अटक वॉरंटला सामोरे जाण्याचा पर्याय दिला. आपली निर्दोषता सिद्ध करण्यासाठी घाबरलेल्या नीरू यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ३ लाख रुपये ट्रान्सफर केले. या घटनेच्या १० दिवसांनंतर, नीरू यांना आणखी एका व्यक्तीचा फोन आला, ज्याने स्वतःला एनसीबीचा 'चांगला अधिकारी' असल्याचे सांगितले. या व्यक्तीने नीरू यांना त्यांच्या निर्दोषत्वाची खात्री दिली आणि गमावलेली रक्कम परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. अवघ्या दोन दिवसांत, नीरू यांच्या खात्यात २०,००० रुपये परत आले, ज्यामुळे 'चांगल्या' अधिकाऱ्यावर त्यांचा विश्वास बसला.
विश्वास जिंकून केला विश्वासघात
त्यानंतर, या अधिकाऱ्यासह चार जणांनी नीरू यांना व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. या 'अधिकाऱ्यांनी' नीरू यांना आपली स्क्रीन शेअर करण्यास आणि बँक खाते (Bank Account) उघडण्यास सांगितले. अधिकाऱ्यावर विश्वास ठेवून, नीरू यांनी त्यांच्या सूचनांचे पालन केले आणि नकळतपणे फसवणूक करणाऱ्यांना नेट बँकिंगचा अॅक्सेस दिला. काही वेळातच, नीरू यांच्या मोबाइल फोनवर ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतच्या अनेक डेबिट व्यवहारांचे मेसेज दिसू लागले. जेव्हा त्यांनी त्या अधिकाऱ्याला फोन केला, तेव्हा त्याचा फोन बंद होता.
(नक्की वाचा- Latur Crime News: मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारल्याने बायकोला जाळले, लातूरमधील भयंकर प्रकार)
२४ सप्टेंबर २०२४ रोजी नीरू यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली. ९ महिन्यांनंतर, २४ जून २०२५ रोजी पोलिसांना एक धागा मिळाला आणि त्यांनी आरोपींपैकी एक अखिलेश याला दिल्लीतील मुखर्जी नगरमधील त्याच्या भाड्याच्या घरातून अटक केली. चौकशीदरम्यान, अखिलेशने पीडितेच्या बँक खात्यातून अमजद, शाहिद आणि शकील यांच्यासह पैसे ट्रान्सफर केल्याची कबुली दिली. आरोपीने सांगितले की, त्याने महिलेला व्हिडिओ कॉलवर तिची फोन स्क्रीन शेअर करायला लावली, ज्याद्वारे त्यांना बँक खात्यात प्रवेश मिळाला.
२७ जून २०२५ रोजी पोलिसांनी हरियाणा येथे छापा टाकून नीरू यांचा विश्वास जिंकणारा अधिकारी अमजद आणि त्याचा साथीदार शाहिद यांना अटक केली. चौकशीदरम्यान, अमजदने खुलासा केला की, तो, त्याचा मेहुणा शाहिद आणि मित्र शकील हे महिलेला खोट्या प्रकरणात गोवण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा कट रचत होते.
आतापर्यंत अवघे ३ लाख रुपये मिळाले
नीरू यांना आतापर्यंत केवळ ३ लाख रुपयेच परत मिळाले आहेत. पोलिसांनी अनेक बँक खात्यांची चौकशी सुरू केली आहे, ज्यातून पैसे फिरवले गेले आहेत. अटक करण्यात आलेल्या ५ आरोपींच्या मोबाइल फोनमध्ये पोलिसांना इतर पीडितांच्या 'सेक्सटॉर्शन'चे पुरावेही सापडले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.