AC with Ceiling Fan : उन्हाळ्यात अधिकांश लोक घर लवकर थंड करण्यासाठी एअर कंडिशनरचं तापमान अत्यंत कमी ठेवतात. मात्र महिन्याच्या शेवटी विजेचं बिल पाहून धक्काच बसतो. रंजक बाब म्हणजे, या समस्येवरील एक सोपा उपाय तुमच्या खोलीतच असू शकतो. तो म्हणजे सीलिंग फॅन. बहुतांश लोक एसी सुरू करताच पंखा बंद करतात, उलटपक्षी दोन्ही उपकरणांसह रूम लवकरच थंड होऊ शकते आणि ही विजेची बचत करण्याची एक प्रभावी पद्धत मानली जाते.
पंख्यामुळे केवळ रूमच नाही तर तुम्हालाही मिळतो थंडावा...
अनेकांना वाटतं की पंख्यामुळे खोलीतील तापमान कमी होतं. मात्र प्रत्यक्षात असं होत नाही. पंख्याचं मुख्य काम हवा तुमच्या शरीरापर्यंत पोहोचणं हे असतं. जेव्हा हवा त्वचेच्या संपर्कात येते, तेव्हा घाम अधिक वेगाने वाफ होऊन निघून जातो आणि शरीरातील उष्णता बाहेर पडते. यामुळे व्यक्तीला प्रत्यक्ष तापमानापेक्षा २ अंश सेल्सिअसपर्यंत थंड वाटू शकते. हे अंतर पाहायला कदाचित कमी वाटू शकतं, मात्र उकाड्यात आरामदायक झोप आणि चांगला थंडावा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो.
AC वरील दबाव कमी...
भौतिकशास्त्रानुसार, थंड हवा खाली जात असते. याच कारणास्तव अनेकदा खोलीतील खालचा भाग, अनेकदा जमिन अधिक थंड असतो. तर वरील भाग गरम असतो. अशात एसीला संपूर्ण खोली समान थंड ठेवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. जेव्हा सीलिंग पंखा चालतो, तेव्हा तो खोलीतील थंड आणि गरम हवा मिसळून ती समान रीतीने पसरवतो. त्यामुळे संपूर्ण खोलीत एकसमान थंडावा पसरतो आणि एसीचा थर्मोस्टेट लवकरच निर्धारित तापमानापर्यंत पोहोचतो. परिणामी कंप्रेसर कमी काळ चालतो आणि विजेचा वापर कमी होतो.
विजेच्या बचतीचं नेमकं गणित...
पंख्यामुळे अतिरिक्त थंडावा निर्माण होतो. त्यामुळे एसीचं तापमान काही डिग्री वाढवू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही यापूर्वी २२ अंश सेल्सिअरवर एसी ठेवत असाल तर पंख्यासह एसी २४ अंश सेल्सिअस किंवा २५ अंश सेल्सिअसवर सेट केल्याने थंडावा राहतो.
एक सामान्य एसी साधारण १००० ते २००० वॉटपर्यंत विजेचा वापर करतो, तर अधिकांश सीलिंग फॅन केवळ १५ ते ७० वॉटदरम्यान वीज वापरतात. ऊर्जा विशेषज्ञांनुसार, एसीचं तापमान प्रत्येक एक डिग्री वाढल्यास कुलिंग खर्चात तब्बल ४ ते ८ टक्क्यांपर्यंत कमी येऊ शकते. त्यामुळे काही डिग्री तापमान वाढल्याने विजेचं बिलात बऱ्याच अंशी फरक दिसू शकतो.
एका भारतीय कुटुंबाचं विजेचं गणित समजून घेऊया...
जर तुमचा एसी उन्हाळ्याच्या दिवसात दररोज आठ तास चालत असेल आणि सर्वसाधारण १५०० वॉट वीज वापरली जात असेल तर प्रतिदिन तब्बल १२ युनिट वीज वापरली जाते. विजेचा दर प्रति युनिट सुमारे 8 रुपये आहे, असं गृहीत धरल्यास, केवळ एसीचा दैनंदिन खर्च सुमारे 96 रुपये येईल. संपूर्ण महिन्याचा हा खर्च अंदाजे 2,880 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
जर तुम्ही एसीचं तापमान ३ डिग्रीने वाढवलं आणि त्यासोबत ५० वॉटचा सीलिंग पंखा चालवला तर पंख्याचा अतिरिक्त खर्च अत्यंत कमी येईल. दुसरीकडे एसी 12 ते 24 टक्क्यांपर्यंत कमी ऊर्जा वापरेल.
असेच काही महिने सरासरी पैसे वाचवणं शक्य आहे. चार महिन्यांच्या उकाड्याच्या दिवसात ही बचत 1200 ते 2400 रुपये किंवा त्याहून अधिक होऊ शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world