येत्या काळात ग्रहमानाची स्थिती आणि त्याचा जागतिक तसेच वैयक्तिक आयुष्यावर होणारा परिणाम याविषयी विविध ज्योतिषी आपली मते मांडत आहेत. ज्योतिष तज्ज्ञ अरुण पंडित यांनी पुढच्या वर्षासाठी काही भाकिते वर्तवली आहेत. त्यांचे म्हणणे आहे की 2026 हे वर्ष केवळ राजकीय उलथापालथीचे नसून आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. 35 वर्षांवरील व्यक्तींनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी केवळ चंद्र राशीवर अवलंबून न राहता लग्न राशीचाही विचार करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
नक्की वाचा: MPSC मार्फत 2026 मधील परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध, कुठे पाहाल संपूर्ण वेळापत्रक?
4 ग्रहणे आणि शनि नेपच्युनची युती
2025 मध्ये राहू केतू शनी आणि ज्युपिटर या ग्रहांनी आपली चाल बदललीहोती. 2026 मध्ये ज्युपिटर वगळता फार बदल होणार नाहीतेय. 20 जानेवारी रोजी शनी आपले नक्षत्र बदलणार आहे. 2026 साली शनी आणि नेपच्यून हे दोन ग्रह एकत्र येत आहेत. ज्योतिष तज्ज्ञ अरूण पंडित यांचे म्हणणे आहे की 2026 साली 4 ग्रहणे येत आहेत. 2020 नंतर एकाच वर्षात 4 ग्रहणे येण्याची ही पहिली वेळ आहे.
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडणार
आर्थिक आघाडीवर हे वर्ष सर्वसामान्य लोकांसाठी आव्हानात्मक असू शकते. 2026 च्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये सोन्या आणि चांदीचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करताना लोकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एफडीसारखी सुरक्षित गुंतवणूक हाच या काळातील यशाचा मंत्र असेल असे पंडित यांनी सुचवले आहे. सीमावर्ती भागात चकमकी वाढण्याची आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता पंडित यांनी वर्तवली आहे. जागतिक पातळीवर भारताची स्थिती सुरुवातीच्या काळात फारशी मजबूत दिसणार नाही असे संकेत मिळत असल्याचंही त्यांचे म्हणणं आहे. मे महिन्यानंतर ग्रहांची स्थिती बदलेल आणि परिस्थिती निवळण्यास सुरुवात होईल. सकारात्मक बदल मे नंतरच दृष्टीपथात येतील असे पंडित यांचे म्हणणे आहे.
स्कँडल बाहेर येण्याची शक्यता
2026 वर्ष जागतिक पातळीवर अनेक स्कँडल आणि घोटाळे उघडकीस आणणारे ठरेल. जगातील मोठे राजकारणी आणि प्रसिद्ध कलाकार यांच्याबद्दलची गुप्त माहिती किंवा घोटाळे बाहेर येतील अशी शक्यता आहे असं पंडित यांचे म्हणणे आहे. त्यांनी म्हटले की, ज्या लोकांची प्रतिमा आजवर स्वच्छ मानली जात होती अशा अनेक दिग्गजांचा खोटारडेपणाचा बुरखा फाटेल आणि त्यांची प्रसिद्धी रसातळाला जाईल. शनी आणि नेपच्यूनच्या युतीमुळे जे लोक सच्चेपणाने वागतात त्यांनाच फायदा होईल. खोटेपणा करणाऱ्यांना या वर्षात मोठा फटका बसू शकतो असे पंडित यांचे म्हणणे आहे.
नक्की वाचा: T20 World Cup 2026 Schedule: भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली!
3 राशींसाठी 2026 हे वर्ष अत्यंत लाभदायी
कुंडलीतील पहिल्या रकान्यात असलेल्या आकड्यावरून प्रत्येक व्यक्तीची लग्न रास ठरते. वयाच्या 35 नंतर चंद्र राशीसोबत लग्न रास पाहणं हे देखील फायद्याचं ठरतं असं अरूण पंडित यांचे म्हणणे आहे. 2026 हे वर्ष मेष, वृषभ आणि कन्या या तीन राशींसाठी अत्यंत शुभ आणि फायद्याचे राहणार आहे. याउलट सिंह,धनू आणि मीन या राशींसाठी हे वर्ष कठीण राहील असे भाकीत पंडित यांनी वर्तवले आहे. सिंह,धनू आणि मीन राशींच्या लोकांनी भविष्यातील संकटासाठी आतापासूनच आर्थिक तरतूद करून ठेवावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे. कुंभ आणि वृश्चिक राशींसाठी हे वर्ष संमिश्र किंवा नेमके कसे असेल हे सांगणे कठीण आहे. अध्यात्म आणि आयुर्वेद क्षेत्रासाठी मात्र हा सुवर्णकाळ असेल. आयुर्वेद टुरिझममध्ये मोठी वाढ होईल आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना नव्या संधी मिळतील असे पंडित यांचे म्हणणे आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world