टाटाची नवीन ब्रँडेड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारताची सर्वात पसंतीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) आपल्या गाड्यांच्या किमतीत मोठी वाढ करणार आहे. कंपनीने अधिकृत परिपत्रक जारी करून स्पष्ट केले आहे की, 1 जुलै 2026 पासून त्यांच्या सर्व पॅसेंजर वाहनांच्या किमती वाढवल्या जातील.
किती रुपयांनी वाढणार किमती?
टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गाड्यांच्या किमतींमध्ये 1.5 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. ही दरवाढ वाहनांच्या वेगवेगळ्या मॉडेल्स आणि त्यांच्या व्हेरियंट्सवर अवलंबून असेल. याचा अर्थ सर्व गाड्यांचे दर सारखे वाढणार नसून, काही मॉडेल्सवर किरकोळ तर काहींसाठी ग्राहकांना हजारो रुपये अतिरिक्त मोजावे लागतील.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
पेट्रोल, डिझेल आणि ईव्ही दोन्ही महाग
या दरवाढीचा फटका केवळ पेट्रोल किंवा डिझेल गाड्या घेणाऱ्यांनाच बसेल असे नाही. टाटा मोटर्सने स्पष्ट केले आहे की, हा नवीन नियम इंटरनल कम्बशन इंजिन (ICE) म्हणजेच पेट्रोल-डिझेल गाड्यांसोबतच त्यांच्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स (EV) वरही समान पद्धतीने लागू होईल. यामुळे टाटाच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Nexon EV, Punch EV किंवा Tiago EV या गाड्या खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना आपले बजेट वाढवावे लागणार आहे.
दरवाढीचे मुख्य कारण काय?
वाहनांच्या किमती अचानक वाढवण्यामागे कंपनीने इनपुट कॉस्ट कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुटे भाग आणि कच्चा माल महागल्यामुळे तसेच बाजारपेठेतील महागाईच्या दबावामुळे हा निर्णय घेणे कंपनीसाठी बंधनकारक बनले होते, असे टाटा मोटर्सकडून स्पष्ट करण्यात आले.
(नक्की वाचा- Navi Mumbai News: नवी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा! सिग्नलवरील यंत्रणेत होणार मोठे बदल)
ज्या ग्राहकांना टाटाची Punch, Nexon, Harrier किंवा Safari यांसारखी हक्काची गाडी खरेदी करायची आहे, त्यांनी 1 जुलैपूर्वी आपले बुकिंग निश्चित करणे फायद्याचे ठरेल. जून महिन्यात गाडी खरेदी केल्यास ग्राहकांचे हजारो रुपये वाचतीलच, शिवाय डीलर्सकडे सुरू असलेल्या मान्सून डिस्काउंट ऑफर्सचाही लाभ घेता येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world