इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) जगात दररोज नवनवीन प्रयोग पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत लोकांना आपली इलेक्ट्रिक स्कूटर प्लग-इन करून चार्ज करावी लागत होती. मात्र, आता थेट सूर्यप्रकाशात चार्ज होणारी एक अनोखी स्कूटर लाँच करण्यात आली आहे. कॅलिफोर्नियाच्या 'अदरलॅब' (Otherlab) या स्टार्टअप कंपनीने 'Lightfoot' नावाची सोलर-पावर्ड इलेक्ट्रिक कार्गो स्कूटर बाजारात आणली आहे. शहरातील लहान प्रवासासाठी आणि सामान वाहतुकीसाठी ही स्कूटर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
बॉडीवरच दिलेत दोन सोलर पॅनेल
'लाइटफूट' स्कूटरचे डिझाइन क्लासिक व्हेस्पा (Vespa) आणि फोक्सवॅगन बसपासून (Volkswagen Bus) प्रेरित आहे. या स्कूटरच्या एअरक्राफ्ट-ग्रेड ॲल्युमिनियम फ्रेमच्या दोन्ही बाजूंना 120-120 वॉटचे दोन सोलर पॅनेल बसवण्यात आले आहेत. चांगल्या उन्हात ठेवल्यास ही प्रणाली दररोज 30 किलोमीटर पर्यंतची अतिरिक्त रेंज देते.
1 तासाच्या उन्हात 5 किमी
1 फक्त तास कडक उन्हात ही स्कूटर पार्क केल्यास सुमारे 5 किलोमीटर चालण्याइतकी बॅटरी चार्ज होते. ही स्कूटर पूर्णपणे सोलरवर चालत नसली, तरी ती दररोज उन्हात पार्क केल्यास नियमित चार्जिंगची गरज खूप कमी होते. सोलर चार्जिंग व्यतिरिक्त यात शक्तिशाली लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Ajinkya Rahane: क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही रहाणेला BCCI कडून मिळणार दरमाह एवढी रक्कम)
बॅटरी आणि जबरदस्त रेंज
- एका चार्जमध्ये 60 किमी: ही बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यावर 60 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
- फास्ट चार्जिंग: नेहमीच्या चार्जरने चार्ज केल्यास अवघ्या 90 मिनिटांत बॅटरी 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.
- रीजनरेटिव्ह ब्रेकिंग: ब्रेक लावल्यावर निर्माण होणारी ऊर्जा पुन्हा बॅटरीमध्ये पाठवण्याची सुविधा यात आहे.
- टचस्क्रीन डिस्प्ले: स्कूटरमध्ये 2.8 इंचाचा वॉटरप्रूफ टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे, ज्यावर स्पीड आणि बॅटरी लेव्हल दिसते.
मोठी 45 लिटरची डिकी
या स्कूटरच्या मध्यभागी 45.2 लिटरची मोठी लॉक होणारी कार्गो डिकी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 20 किलोपर्यंतचे सामान सहज ठेवता येते. ऑफिस बॅग, किराणा सामान किंवा हेल्मेट ठेवण्यासाठी ही जागा पुरेशी आहे. डिकी मध्यभागी असल्याने स्कूटरचा समतोल उत्तम राहतो.
(नक्की वाचा- Mumbai News: इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरला अपहरण करून बेदम मारहाण; 'या' रील्स जीवावर बेतल्या)
डुअल मोटर आणि फीचर्स
दोन्ही चाकांमध्ये 750-750 वॉटच्या ब्रशलेस हब मोटर्स देण्यात आल्या आहेत. ही स्कूटर ताशी 32 किलोमीटर वेगाने धावू शकते. 62 किलो वजन असलेल्या या स्कूटरमध्ये हायड्रॉलिक डिस्क ब्रेक, 10 इंचाची चाके, 120 डेसिबलचा हॉर्न आणि इलेक्ट्रॉनिक व्हील लॉक असे सुरक्षेचे फीचर्स आहेत.
किंमत किती?
'Lightfoot' सोलर स्कूटरची सुरुवातीची किंमत 4,995 डॉलर्स (सुमारे 4.75 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. सध्या ही स्कूटर अमेरिकन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. भारतात ही स्कूटर कधी लाँच होणार याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world